दुभत्या जनावरांचे पोषण

शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचा व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई, गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात. पण यामध्ये प्रामुख्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. गाई-म्हशींना त्यांच्या दूध उत्पादन क्षमतेनुसार सकस, संतुलित आहार देणे गरजेचे आहे. त्यांना पाणी, प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे ही पोषक घटके मिळणे आवश्यक असते. पण सर्वसामान्यपणे जनावरांना वाळलेला चारा, उपलब्ध असल्यास हिरवा चारा, शक्य असल्यास पेंड अशा प्रकारचा आहार दिला जातो. यामुळे थेट दूध उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादन घटते. जर संतुलित खाद्य, हिरवा, तसेच वाळलेला चारा (कुट्टी करून) दूध उत्पादनाच्या प्रमाणात दिल्यास अपेक्षित दूध उत्पादन मिळू शकते.
दुभत्या जनावरांच्या सामान्य पोषणासाठी त्यांना 1 ते 1.5 किलो खुराक, 15 ते 20 किलो हिरवी तर 4 ते 5 किलो वाळलेली वैरण द्यावी लागते. मात्र जास्त दूध उत्पादन हवे असल्यास, पुढील प्रत्येक 2.5 लिटर साठी 1 किलो जास्तीचे पशुखाद्य द्यावे लागते.

 

आवश्यक चाऱ्याचे प्रकार:
पाणी: जनावरांना दिवसभरात 80 ते 120 लिटर पाणी लागते. एक लिटर दूध निर्माण होण्यासाठी 4 ते 5 लिटर पाण्याची आवश्यकता असते.
खनिजद्रव्य किंवा क्षार: जनावरांच्या शरीराची वाढ होण्यासाठी, झीज भरून काढण्यासाठी, रोग प्रतिकारक शक्तीसाठी तसेच दूध वाढवण्यासाठी जनावरांना कॅल्शियम, फोस्फरस, सोडीयम, झिंक यांसारख्या क्षारांची गरज असते.
प्रथिने: संतुलित खाद्यात कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थांसोबत प्रथिनांचीही आवश्यकता असते. शरीरातील पेशींच्या वाढीसाठी स्नायू तयार करण्याकरिता प्रथिनांची गरज भासते. द्विदल धान्यात उदा. सोयाबीन, भुईमूग, हरभरा, सूर्यफूल, जवस, तीळ इ. तेलबियांपासूनही भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. प्रथिनांच्या प्राणीजन्य स्त्रोतांमध्ये फीश मिल, मीठ मिल इ. चा समावेश होतो.
जीवनसत्त्वे:  ही अल्प प्रमाणात लागतात; परंतु शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. उदा. अ, ब, क इत्यादी. अशा प्रकारे निरनिराळे अन्नघटक आहारात समतोल प्रमाणात एकत्र करून संतुलित खाद्य तयार करता येते. दूध देणार्‍या जनावरांकरिता संतुलित खाद्यात 16-18 टक्के पचनीय प्रथिने, 70 टक्के एकूण पचनीय पदार्थ आणि 17 टक्क्यांपेक्षा कमी तंतुमय पदार्थ असावेत.