सिताफळ लागवडीसाठी दौलताबाद (औरंगाबाद), बीड, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सोलापूर इ. जिल्हे प्रसिद्ध आहेत. सिताफळ अत्यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात मिसळून त्याचे सरबत करतात.
वैशिष्ट्ये:
सीताफळाच्या फळाचे वजन साधारणता: 150-300 ग्रॅम पर्यंत असते. सीताफळाचे झाड बदलत्या वातावरणातील तग धरू शकते. या झाडाच्या फांद्या व पानामध्ये हायड्रोसायनिक आम्ल (HCN) असते. या द्रव्यामुळे या झाडाला जनावरे खाऊ शकत नाही. तसेच जास्त पाण्याची गरज नसल्यामुळे, कोरडवाहू भागांमध्ये हे उत्कृष्ट फळपिक असून हलक्या व मुरमाड, पडीक जमिनीमध्ये या फळपिकाची लागवड फायदेशीर ठरते.
सिताफळ चवीला गोड असून गर मऊ, दुधाळ, रसाळ व मधुर असतो. या फळामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण 23-24% इतके आहे. सिताफळामध्ये जातीपरत्वे गराचे प्रमाण 28-55% व साखरेचे प्रमाण 18-19% असते.
जमिन आणि हवामान:
सिताफळ हे गाळाच्या, पाण्याच्या निचरा होणाऱ्या जमिनीत, लाल मुरमाड, हलक्या खडकाळ जमिनीत तसेच दगड गोटे असलेल्या जमिनीत देखील फळपिक म्हणून घेता येते. सिताफळ पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक असते. सिताफळ या पिकांसाठी सरासरी 500-750 मी.मी पावसाची गरज असते.
सिताफळ लागवडीसाठी जाती:
- वॉशिंग्टन: या जातीचे फळ साधारणत: 165 ग्रॅम. वजनाचे असते. या जातीच्या फळांचा गर मऊ, लोण्यासारखा असतो.
- बाळानगर: बाळानगर जात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. या जातीचे फळे आकाराने मोठी असतात. गराची चव अतिशय चांगली असते, इतर जातीच्या तुलनेत या जातीच्या फळांना बाजारभाव चांगला असतो.
- मेमॉब: या फळामध्ये बियांचे प्रमाण कमी असते. फळाची चव, स्वाद, अप्रतिम असतो. प्रति झाडावर 80-100 फळे लागतात. साधारणत: फळाचे वजन 180-190 ग्रॅम असते.
- ब्रिटीश गियाना: उत्पादनाच्या दृष्टीने ह्या जातीच्या झाडाला भरपूर फळे लागतात. फळे आकर्षक असून 175-200 ग्रॅम. वजनाचची असतात.
या व्यतिरिक्त सीताफळाच्या अर्का सहान व फुले पुरंदर इ. जाती आहेत.
लागवड कशी करावी:
सीताफळाची रोपे खात्रीशीर नर्सरी मधून खरेदी करावीत. बियांपासून अभिवृद्धी केल्यास झाडाला फळ येण्यासाठी कालवधी जास्त लागतो व रोपांमध्ये वांशिक दृष्ट्या अलगीकारणाची मात्र जास्त असते. असे रोपे लावल्यास वापरल्यास फळधारणा होण्यासाठी जास्त कालावधी लागतो. बियांपासून तयार केलेले रोपे मातृवृक्षाच्या गुणधर्माप्रमाणे (True to Type) नसतात.
सीताफळ बागेमध्ये लवकर फळधारणा होण्यासाठी व मातृवृक्षाच्या गुणधर्माप्रमाणे फळे उत्पादनासाठी कलमे पद्धतीने अभिवृद्धी केलेली कलमे लागवडीसाठी वापरावेत.
लागवडीसाठी पूर्वतयारी:
साधारणता: मी महिन्यांमध्ये जमिनीवर 45x45x45 सें मी. आकाराचे खड्डे खणावेत. खड्ड्याच्या तळाशी क्लोरोपायरीफॉस 2.5 मी.ली. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात 50 मिली कार्बनडोझीम व 0.2% द्रावण प्रति खड्डा 5 लिटर टाकावे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला खड्डा 20 किलो शेणखत. निंबोळी पेंड 3 किलो. ट्रायकोडर्मा 25 ग्रॅम अॅझोटोबॅक्टर 15 ग्रॅम व स्फुरद विरघळविणारे जीवाणू 15 ग्रॅम घटकांनी भरून घ्यावे नंतर एक हलके पाणी देऊन खडयामध्ये विघटन होऊन द्यावे. दोन खड्डयामधील अंतर 5×5 मी. ठेवावे.
लागवड:
पाऊस सुरु होण्याच्या वेळेस (जून-जुलै) मध्ये 5×5 मी. अंतरावर केलेल्या खड्ड्यामध्ये सीताफळाच्या योग्य जातीचे कलमांची लागवड करावी. व लागवड केल्याबरोबर कलमाच्या मुख्य खोडाभोवती मातीच्या उंचवटा करून तो पायाच्या तळव्याने घट्ट करून घ्यावा, जेणेकरून कलम सरळ वाढेल. लागवड केल्याबरोबर कलमांना बाबूंच्या सहाय्याने सरळ वळण देण्यासाठी आधार द्यावा व हलक्या स्वरूपाचे पाणी द्यावे.