महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पिक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. सध्या ज्वारी, हरभरा, सूर्यफुल, करडई, गहू या पिकांच्या पेरण्या चालू आहेत. प्रस्तुत लेखात जिरायती गव्हाच्या लागवडी विषयी उहापोह केला आहे.
जमिन व पूर्वमशागत:
गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमिन निवडावी. शेवटच्या कुळवणी अगोदर 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून दयावे. जिराईत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी.
जिराईत पेरणीसाठी वाण:
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत निफाड गहू संशोधन केंद्रातर्फे नेत्रावती हा कोरडवाहू भागासाठी अनुकूल वाण 2011 मध्ये प्रसारित करण्यात आला.
नेत्रावती वाणाची वैशिष्ट्ये:
- पाण्याची एक सोय असली तरी त्याची लागवड शक्य आहे.
- कोरडवाहू क्षेत्रात हेक्टरी 18 ते 20 व मर्यादित सिंचन असल्यास 25 ते 30 क्विंटल उत्पादन क्षमता या वाणात आहे.
- उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम व आकर्षक प्रथिनांचे प्रमाण 12 टक्के
- तांबेरा रोगास प्रतिकारक चपातीसाठी उत्तम वाण आहे.
जिराईत पेरणीसाठी पंचवटी (एनआयडीडब्लू-15), शरद (एनआयएडब्लू-2997-16) व मर्यादित सिंचनाची व्यवस्था असल्यास नेत्रावती (एनआयएडब्लू-1415) या वाणांची निवड करावी.
पेरणी:
पाऊस बंद झाल्यावर व जमिनीत योग्य वाफसा आल्यावर पेरणी करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 75 ते 100 किलो बियाणे वापरावे. बी फोकून न देता पाभरीने पेरावे. पेरणी करतांना दोन ओळीतील अंतर 22.5 से.मी. ठेवावे. बियाणे 5 ते 6 से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. उभी आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणी शक्यतो दोन चाड्याच्या पाभरीने करावी.
बीजप्रक्रिया:
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्मा+1.25 ग्रॅम कार्बेन्डॅझिम (75 डब्लूपी) ची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर गव्हाच्या 10 ते 15 किलो बियाण्यास प्रत्येकी 250 ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळवणारे जीवाणूंची बीजप्रक्रिया करावी. जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करतांना गुळाच्या थंड द्रावणाचा (10 ग्रॅम गुळ प्रति लिटर पाणी) आवश्यक त्या प्रमाणात वापर करावा. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे पेरणीपूर्वी काही वेळ सावलीत वाळवावे.
खत व्यवस्थापन:
जिरायती गव्हास पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 40 किलो नत्र (87 किलो युरिया) आणि 20 किलो स्फुरद (125 किलो सिंगल सुपर फॉस्पेट) दयावे. पेरणीनंतर तीन आठवड्यानी खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. जिरायती गहू पिकाची वाढ ही जमिनीतील उपलब्ध ओल्याव्यावर होते. एक पाण्याची उपलब्धता असल्यास पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी दयावे.
प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)