वनश्री हीच धनश्री (विशेष लेख)

आपल्या आयुष्यात वन मोठं की धन या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने एकदा श्वास बंद करून नोटा मोजताना मिळवण्याचा प्रयत्न करावा असं उदाहरण वनमंत्री श्री. मुनगंटीवार नेहमी देतात. श्वास बंद करून नोटा मोजल्या तर धाप लागते, जीव गुदमरतो… म्हणजे आपल्या जगण्यासाठी श्वास किती मोलाचा आहे हे लक्षात येताना वन मोठं की धन याचं उत्तरही आपल्याला मिळतं. वनांमधून निसर्गाची जोपासना होताना, पर्यावरण समतोल, पशू-पक्षी आणि वन्यजीवांसाठी अन्नसाखळी समृद्ध होत असते. पर्यावरणीय प्रश्न सुलभतेने सोडवणे शक्य होते. वनात अनेक रोजगार संधी दडलेल्या आहेत. त्यामुळे वनश्री हीच धनश्री असल्याचे स्पष्ट होते. वनश्री वाढवण्याची संधी आपल्या सर्वांना १३ कोटी वृक्ष लागवडीच्या मिशनमधून प्राप्त होत आहे. चला तर मग प्रत्येकजण एक तरी झाडं लावू या !

निसर्ग भ्रमंती आवडत नाही असा माणूस शोधून सापडणं जरा कठीणच. प्रत्येकाला निसर्गाच्या सान्निध्यात जायला आवडतं. शांत-सुंदर आणि आरोग्यसंपन्न वातावरण आपल्या सर्वांच्याच मनाला मोहून टाकतं. मग या निसर्गाची संपन्नता राखणं आपली जबाबदारी नाही का? राज्य आणि राष्ट्रीय वन नीतीनुसार राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वन असणं आवश्यक आहे. आपल्या महाराष्ट्रात हे २० टक्के आहे. म्हणजे साधारणत: १३ टक्क्यांची उणीव आपल्याला भरून काढायची आहे. यासाठी आपल्याला वन आणि वनेतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी लागणार आहे. हे एकट्या वन विभागाचं किंवा वन विभागातील कर्मचाऱ्यांना करता येईल असं काम नाही. यासाठी केवळ वन जमीन पुरेशी नाही. म्हणूनच या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप यावे, यात अधिकाधिक लोकांनी सहभागी होऊन ही वृक्षदिंडी पुढे न्यावी, जिथे मोकळी जागा आहे तिथे सर्वांच्या सहभागातून वृक्ष लागावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

महा वृक्षलागवड मिशन हे लोकांना वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उपलब्ध करून दिलेले हक्काचं व्यासपीठ आहे. वन विभागाने शासनाचे सर्व विभाग, समाजातील सर्वस्तरातील व्यक्ती आणि मान्यवरांच्या सहभागातून हे मिशन राबविण्यास सुरुवात केली आहे.

पहिल्या वर्षी २ कोटी वृक्ष एकाच दिवशी लावण्याचा संकल्प होता. हा संकल्प पूर्णत्वाला जाईल की नाही असे वाटत असतांना केवळ एका दिवसात २ कोटी ८२ लाख वृक्ष  राज्यात लागले.  लोकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसादातूनच महा वृक्षलागवडीचे बीज रुजले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चांगलं काम करावयाचा निर्णय घेतला तर लोक किती भरभरून प्रतिसाद देतात हे यातून स्पष्ट झालं आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प जाहीर केला.

याचा पहिला टप्पा गेल्या वर्षी म्हणजे २०१७ च्या जुलै महिन्यात पार पडला. १ जुलै ते ७ जुलै २०१८ या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लावायचे होते. राज्यात या कालावधीत तब्बल ५ कोटी ४३ लाख रोपं राज्यात लागली. राज्यातील आबालवृद्धांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन हा संकल्प पूर्णत्वाला नेला. आता यावर्षीच्या पावसाळ्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत सर्वांच्या सहभागातून १३ कोटी वृक्ष आपल्याला लावायचे आहेत. पर्यावरणाचा समतोल राखतांना आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या आरोग्यसंपन्न श्वासांसाठी वृक्षसंपदा वाढवणं आणि तिचं जतन करणं काळाची गरज ठरत आहे. वाढत्या जागतिक तापमानाच्या दुष्परिणामांपासून वाचायचे असेल तर राज्याचं हरित क्षेत्र वाढवणं हा एक उत्तम पर्याय आहे. गेल्यावर्षी लातूरला रेल्वे बोगीने पाणी द्यावं लागलं होतं. ही कौतुकाची बाब नसल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सांगतात. राज्यातल्या दुष्काळाला हद्दपार करायचे असेल तर राज्यातील वृक्षाच्छादन वाढायला हवे. गडचिरोली, सिंधुदूर्ग मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षाच्छादन आहे त्यामुळे तिथे पाण्याची कमी नाही. टँकर लावावा लागत नाही. पण मराठवाड्याचं वनक्षेत्र हे अत्यल्प आहे. ते वाढवायचं असेल तर तिथे मोठ्या प्रमाणात वृक्षाच्छादन वाढणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन तिथे राज्यातली पहिली इको बटालियन नियुक्त करण्यात आली आहे.  मनरेगा अंतर्गत शेत जमीन शेतबांधावर आता सामाजिक वनीकरण शाखेच्या सहाय्याने फळझाड लागवड करता येणार आहे. स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २५ लाखांपर्यंतचा निधी वृक्ष लागवडीच्या जनजागृतीच्या कामांसाठी खर्च करता येईल. प्रत्येक विभाग आपल्या तरतुदीच्या ०.५ टक्के निधी यावर खर्च करू शकेल, असे काही महत्वाचे निर्णय घेतले गेल्याने हे मिशन सुलभतेने राबविणे, लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे.

वनश्री हीच धनश्री (विशेष लेख) वनश्री

रानमळा पॅटर्नच्या धर्तीवर वृक्षलागवडीचा संकल्प जवळपास सर्वच गावांनी केला आहे. शुभेच्छा वृक्ष, आनंद वृक्ष, स्मृती वृक्ष, माहेरची झाडी, यासारख्या आपल्या जीवनातील सुख:दुखाच्या प्रसंगांच्या आठवणी वृक्ष लावून चिरंतन करण्याचा प्रयत्न यातून राज्यभरात होत आहे. जलयुक्त शिवार मध्ये होणाऱ्या कामांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होत आहे. जलयुक्त शिवार प्रमाणे वनयुक्त शिवार संकल्पनेला यातून बळकटी मिळत आहे.

वनश्री हीच धनश्री (विशेष लेख) वनश्री

आपल्या सर्वांना “हरित सेने”च्या माध्यमातून ही वन विभागाच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होता येणार आहे. हरित सेनेचं सदस्य होणं फार सोपं आहे. http://www.greenarmy.mahaforest.gov.in या किंवा http://www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर जाऊन आपण हरित सेनेचे सदस्य होऊ शकतो. राज्यात आजमितीस ५२ लाखांहून अधिक लोकांनी हरित सेनेचं सदस्यत्व स्वीकारलं आहे. मग आपण का मागं राहायचं? चला तर मग हरित महाराष्ट्राच्या चळवळीत आपण ही सहभागी होऊ या, महावृक्षलागवड मिशनमधील १३ कोटी वृक्षलागवडीत एक वृक्ष लावून तो जगवण्याचा संकल्प करूया. कारण वनश्री हीच धनश्री आहे आणि वृक्ष आहे तर जीवन आहे.