शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली शेळी विकत घेणे चांगले असते.
१. जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले असते. दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे. दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी. चपळ असावी.
२. शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी.
३. शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा, हेही महत्त्वाचे लक्षण आहे. केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल.
४. शक्यतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी. पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. चरताना अंतर पार करण्यासाठी मजबूत पायांचा उपयोग होतो.
५. शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. तिला कासदाह तर नाही ना, याची तपासणी करावी. दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. करडे रोगमुक्त, तसेच परोपजिवी कीटकांपासून मुक्त असावीत.
संगमनेरी शेळी संशोधन योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ०२४२६- २४३४५५