Share

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 6 सदस्यांची मुदत दिनांक 01 जानेवारी, 2022 रोजी समाप्त होत आहे. या रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

श्री. रामदास गंगाराम कदम (मुंबई), श्री. अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), श्री. सतेज उर्फ बंटी डी पाटील (कोल्हापूर), श्री. अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), श्री. गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम), श्री. गिरीशचंद्र बच्छराज व्यास (नागपूर) हे सदस्य दि. 1 जानेवारी 2022 रोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

या निवडणूकीची अधिसूचना मंगळवार, दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिवस  दि. 23 नोव्हेंबर (मंगळवार) 2021 आहे. दि.24 नोव्हेंबर 2021 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस शुक्रवार, दि. 26 नोव्हेंबर,2021 असा आहे.

या सहा जागांसाठी शुक्रवार, दि. 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तसेच मंगळवार दिनांक 14 डिसेंबर, 2021 मतमोजणी केली जाईल. या निवडणुकीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरुवार दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण होईल.

भारत निवडणूक आयोगाने कोविड-19 संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे तसेच यासंदर्भात अलीकडेच दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. या मार्गदर्शक सूचना https://eci.gov.in/candidate-political-parties/instructions-on-covid-१९/. संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

महत्वाच्या बातम्या –  

मुख्य बातम्या

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon