ज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. रक्तदाब आणि हृदयासंबंधित आजारांवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे पदार्थ असावेत.
ज्वारीमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक, शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत भौतिक, रासायनिक व प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबीवरती अवलंबून असते. आपल्याकडे प्रामुख्याने ज्वारीचा उपयोग भाकरीसाठीच होतो. काही वाणांचा उपयोग इतर अनेक खाद्यपदार्थांसाठी केला जातो. ज्वारीची भाकरी गोडसर चवीची, चांगल्या टिकवण क्षमतेची, आकर्षक पांढऱ्या रंगाची असते.
ज्वारीचे फायदे
- ज्वारीची भाकरी ही पचण्यास सोपी आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास हार्मोन्सचे असंतुलन होण्याची समस्या निर्माण होत नाही.
- ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ॲसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खावी, त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांच्या आहारात ज्वारीची भाकरी असली पाहिजे.
- ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि खनिज घटकांमुळे रक्त दाब नियंत्रणात राहतो.
- ज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.
- सध्या रक्तदाब आणि हृदयासंबंधित आजारांच्या समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे पदार्थ असावेत.
- ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आहारात चपातीच्या ऐवजी ज्वारीची भाकरी खावी.
- सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.
- ज्वारी शरीरातील इन्शूलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते.
ज्वारीतील घटक
आहारदृष्ट्या ज्वारीच्या दाण्यांत ओलावा (आर्द्रता) आठ ते दहा टक्के, प्रथिने ९.४ ते १०.४ टक्के, तंतुमय घटक १.२ ते १.६ टक्के, खनिजद्रव्ये १.० ते १.६ टक्के, उष्मांक ३४९ किलो कॅलरीज, कॅल्शिअम २९ मिलिग्रॅम, किरोटीन (प्रो-व्हिटॅमिन ए) ४७, थायमिन ३७ मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅममध्ये आढळतात. ज्वारीमध्ये लायसीन व मिथिलोअमाईन ही आवश्यक अमिनो ॲसिड्स मर्यादित प्रमाणात आढळतात. पांढऱ्या ज्वारीमध्ये टॅनिन नावाचा ऍण्टी न्यूट्रिशनल (अपायकारी) घटक आढळत नाही, तो लालसर ज्वारीत भरपूर प्रमाणात असतो.
– जी. बी. देसाई , : ९८८१८४२५२५
(अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्न तंत्र महाविद्यालय, परभणी)