जलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा संकल्प

पुणे : जांब (ता. कोरेगाव, जि. सातारा) या गावाने एकत्रित काम करून जलसंधारणाद्वारे शेतीचे पाणी वाढविण्याचा आणि त्याद्वारे गावाचे कृषी उत्पन्न 1 कोटी रुपयांनी वाढविण्याचा संकल्प केला असून पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास गेलेल्या कामांमुळे गावातील 500 एकर पडीक जमीन लागवडीखाली येणार आहे. गावच्या सरपंच सौ. रेश्मा निकम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुण्यातील ‘अनिवासी सातारकर मित्र ‘ संस्थेने गावाला मदतीचा हात देऊन जांब गावाला स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार केला आहे, असेही सरपंच सौ. रेश्मा निकम यांनी सांगीतले. जरंडेश्वर डोंगराला लागून असलेल्या जांब या गावाची लोकसंख्या 1994 इतकी आहे. जलयुक्त शिवार, पाणी फाऊंडेशन स्पर्धा, वनविभागाची कामे अशा अनेक माध्यमातून गावाने श्रमदान, योगदान देऊन गावातील पाणी पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले.

गावाने 19 हजार मीटर इतके सलग समतल चर (सी.सी.टी.) घेतले आहेत. 2 पाझर तलाव सी.ओ.टी. घेतले आहेत. लोकसहभागातून 4 हजार खड्डे वृक्षारोपणासाठी घेतले. वनविभागाने 6 हजार खड्डे वृक्षारोपणासाठी घेतले. रोपवाटिका उभारून चिंच, करंज, जांभूळ अशी 5 हजार झाडे, रोप तयार केली. भारतीय जैन संघटनेने गावाला ‘जेसीबी’, ‘पोकलेन’ दिले. त्यातून 350 तास काम झाले. या दोन यंत्रांसाठी डिझेलची व्यवस्था वर्गणी काढून करण्यात आली. ओढ्यांचे खोलीकरण, माती नाल्यातील गाळ काढणे, पाझर तलावातील गाळ काढणे अशी कामे झाली.

गावाला 3 डोंगराचे सानिध्य आहे. या डोंगरातून ‘माथा ते पायथा’, तत्त्वावर जलसंधारणाची कामे केली. त्यासाठी 3 पुरुष, 2 महिलांनी ‘पाणी फाऊंडेशन’चे प्रशिक्षण घेतले. पहिल्याच वर्षी ’पाणी फाऊंडेशन’च्या स्पर्धेत सहभागही घेतला. ‘सरपंच म्हणून मी जलसंधारणाच्या सर्व योजनांमध्ये लोकसहभागासह हिरीरीने भाग घेण्याचा निर्णय घेतला. गावात जनजागृती केली. रोज पहाटेपासून प्रत्यक्ष कामेही केली’ असे सरपंच सौ. रेश्मा निकम यांनी सांगितले.

‘शेजारच्या अनेक गावात हिरवळ दिसत असताना आमची शिवारे, शेती उघडी दिसत असे. जलसंधारणाच्या कामातून शेतीला पाणी मिळून गावचे एकत्रित कृषी उत्पन्न 1 कोटी रुपयांनी वाढेल, असा आत्मविश्वास आम्हाला आला आहे.’ असे गावकरी संतोष निकम (बाळू मिस्त्री) यांनी सांगितले.

खरीपाचे पहीले पिक सोयाबिन निघाल्यावर 5OO एकर शेती पाण्यावाचुन मोकळी असायची आता रब्बी हंगामात या वर्षीच्या जलसंधारणाच्या कामामुळे पाणी ऊपलब्ध झाल्यानंतर गहू, हरबरा, ज्वारी अशी पिके घेता येतील

पुण्यातील अनिवासी सातारकर, स्वयंसेवी संस्था, कंपन्यांचे सीएस आर फंड यातून गावाचे जलसंधारण नियोजन पूर्ण व्हावे, आणि गावातील सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘अनिवासी सातारकर संस्था प्रयत्न करणार आहे, ‘ असे संस्थापक बी.एस. जाधव यांनी सांगीतले.

https://maharashtradesha.com/baramati-news/