मोगऱ्याचे शास्त्रीय नाव Jasminun Sambac (जासमिनन साम्बाक) असे असून ती भारतीय वनस्पती आहे. नोव्हेंबर महिना सरला की मोगऱ्याला बहर यायला सुरुवात होते. मोगऱ्याचे झुडुप किंवा वेल असते. ते फुलांनी बहरतात. हिरव्यागार पानांमध्ये पांढरीशुभ्र फुलांची रंगसंगती खूप संदर दिसते. आकाशातील चांदण्याच या रोपाला/ वेलीला लगडल्यात की काय असेच वाटते. मोगरा ही खूप सूर्यप्रकाशात वाढणारी वनस्पती. त्याला सावली अजिबात आवडत नाही. सावलीत असणाऱ्या मोगऱ्याला कधीही फुले येत नाहीत. प्रखर सूर्यप्रकाशात मोगरा बहरतो. मोगऱ्याला फुले येतात. पण फळधारणा होत नाही नि फळे नसल्यामुळे बिया नसतात, त्यामुळेच मोगऱ्याची रोपे तयार करण्यासाठी मोगऱ्याच्या फांद्या वापरल्या जातात. पावसाळ्यात मोगऱ्याची फांदी लावली असता लवकर जगते.
जमीन :
मोगरा जरी सर्व प्रकारच्या जानिनीत येत असला तरी मोगऱ्याला मध्यम खोलीची (३ फूट) व भुरकत रंगाची, चुनखडी नसलेली जमीन (५ टक्क्यांपेक्षा कमी) योग्य ठरते. जमिनी चांगली निचरा होणारी असावी. निचरा न झाल्यास मोगऱ्याची पाने पावसाळ्यात विशिष्ट पिवळी पडतात. तरी वरील जमीन मोगऱ्यासाठी योग्य समजावी
पुर्वमशागत :
जमीन डिसेंबर – जानेवारी महिन्यामध्ये २५ ते ३० सेंमी खोल नांगरून घ्यावी. २ – ३ फुळवाच्या पाळ्या घालून सपाट करावी. नंतर ५ x ५ फुट अंतरावर १ x १ x १ फुट आकारचे खड्डे खोडून घ्यावेत.
खड्डा कसा भरावा : खड्डा भरताना प्रथम तळाशी वाळलेले गवत. काडी कचरा सहा इंच उंचीपर्यंत भरावा व नंतर एक घमेले पुर्ण कुजलेले शेणखत किंवा एक ओंजळभर गांडूळ खत व कल्पतरू १०० ग्रॅम टाकून मातीने खड्डा भरून घ्यावा.
हवामान :
मोगरा साधारणत : स्वच्छ हवामानात चांगल्या प्रकारे येतो. अतिशय थंडी चालत नाही. मोगऱ्याची चांगली वाढ होण्यास २५ डी. ते ३५ डी. से. तापमान योग्य ठरते. अशा हवामानात कळ्या भरपूर लागून उत्पन्न वाढते.
मोगऱ्याच्या जाती :
मोतीचा बेला : कळी गोलाकार असते आणि फुलात दुहेरी पाकळ्या गोलाकार असतात.
बेला : या मोगऱ्याच्या जातीला तामिळ भोषेत ‘गुडूमल्ली’ म्हणतात. फुलाता दुहेरी पाकळ्या असतात पण लांब नसतात.
हजरा बेला: कानडी भाषेत ‘सुजीमल्लीरो’ म्हणतात. फुलात एकेरी पाकळ्या असतात.
मुंग्ना : तामिळ भाषेत ‘अड्डुकुमल्ली’ व कानडीत ‘एलुसूत्ते मल्लरी’ म्हणतात. कळ्या आकाराने मोठ्या (२.५ सेमी व्यास) असतात. फुलात अनेक गोलाकार पाकळ्या असतात.
शेतकरी मोगरा : (एक कळीचा मोगरा) ह्या मोगऱ्याला चांगल्या प्रतीच्या काळ्या येत असून हार व गजरे याकरीता वापरला जातो.
बट मोगरा : (डबल पाकळीचा) ह्या मोगऱ्याच्या कळ्या आखुड असून कळ्या चांगल्या टणक फुगतात.
बट (मोती) मोगरा व शेतकरी मोगरा तुलना :
बट (मोती) मोगऱ्याच्या पाकळ्या घट्ट, टणक व जाड असतात. पाकळी ही कमळासारखी एकावर एक घट्ट असते. त्याला आकर्षक चमक व मंद, दिर्घकाळ दरवळणारा सुगंध असतो. काढणीस जरी उशीर झाला. तरी पाकळ्या भरपूर व फुल घट्ट असल्याने टिकाऊपणा वाढतो.
शेतकरी मोगऱ्यामध्ये मात्र असे नसते, ह्याला ५ पाकळ्या असून त्या लांबट जाई, कुंड्यासारख्या पातळ असून काढणीस उशीर किंवा काढणीनंतर विक्रीस उशीर झाला तर पाकळ्या लुज पडून निस्तेज दिसतात. कळी नाजूक आणि मऊ असून उष्णतेने जांभळी लाल ते करड्या रंगाची होते. कळ्या काढल्यानंतर लगेच उमलतात. देठ नाजूक असतो. हारामध्ये निट ओवला जाता नाही.
बट मोगऱ्याचा गजर आकर्षक होतो. मोती मोगऱ्याचे झुडूप आकर्षक राहते. त्याला पाने पोपटी व गोलाकार असतात. पण थोडे पोपटी मऊ व डल असते. पंजे लांब नसतात.
याउलट शेतकरी मोगऱ्याची आकर्षक, चमकदार शेंड्याला लांबट गोल, हिरवीगार दिसायला मऊ , पण हात लावल्यास कडक असतात. फुट वेलीसारखी असते. मोगरा हा काटक असल्याने यावर ऊन किंवा थंडीचा प्रादुर्भाव होत नाही. तरीपण शेतकरी मोगऱ्यापेक्षा मोती मोगर हा जास्त काटक व एकाच जागी गुच्छाच्या स्वरूपात फुले लागतात. कळ्या वजनदार असल्याने तोडणीस सोपे, वाया न जाणारी असल्याने तोडणीचा खर्च कमी व भाव अधिक असतो. विदर्भ, मराठवाडा, राजस्थान, बिहार, कर्नाटक, तमिळनाडू, दिल्ली, हरियाना अशा थंड व उष्ण विषम हवामानामध्ये या मोगऱ्याच्या पिकाच्या लागवडीस फार मोठा वाव आहे.
मोगरा लागवडीचा काळ :
मोगऱ्याची लागवड जूनचा पहिला पाऊस पडून गेल्यानंतर करावी. मोगऱ्याची लागवड शक्यतो पिशवीतील रोपे लावून करावी. त्यामुळे दीड ते दोन महिने रोपे नर्सरीत वाढतात व मर टळली जाणे.
मोगरा कसा लावावा :
निर्यात करू इच्छिणाऱ्या बागाईतदरांनी नर्सरीमधील विविध जातींपैकी योग्य रोपे आणून लागवड करावी. रोपे लावताना पिशवी दोन्ही बाजूला ब्लेडने कापून (मुळांना इजा न होता) काढावी. नंतर हुंडीच्या आकाराची माती खड्ड्याच्या मधोमध काढून रोप लावावे. रोपाचे खोड वर राहील याची काळजी घ्यावी. नंतर शेजारील माती रोपाला लावून हलके पायांनी दाबून घ्यावे. यामुळे जमिनीत पोकळी राहत नसून झाड न कोलमडता सरळ वाढते.
रोपे लावल्यानंतर जर्मिनेटर १ लिटर व पाणी १०० लिटर यांचे द्रावण तयार करून प्रत्येक रोपाच्या शेंड्यावरून बुंध्यावर १०० मिली ओतावे. म्हणजे मुळांचा जारवा चांगला वाढून फुट वाढते. मर होत (नांग्या पडत) नाही.
लागवडीनंतर जून ते डिसेंबरपर्यंत घ्यावयाची काळजी: रोपांची झपाट्याने वाढ होण्यासाठी प्रत्येक झाडास १० ते १५ ग्रॅम मिश्रखत द्यावे. रोगमुक्त फुट जारवा वाढणे व फुले चांगल्या प्रकारे लागण्यासाठी प्रत्येक झाडास २५ ग्रॅम मिश्रखताचा वापर दर महिन्यास करावा. पुढे दिल्याप्रमाणे फवारण्या केल्यास मोगऱ्याला कळ्याचे प्रमाण वाढते. जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट,प्रिझम, न्युट्राटोन हार्मोनीचा वापर दर महिन्याला पुढे दिलेल्या प्रमाणात करावा.
झाडांना ताण देणे :
झाडांना ताण देताना आपण पाणी देणे थांबवतो. शक्यतो डिसेंबरमध्ये खांदणी करून जानेवारीमध्ये शेणखत व पाणी द्यावे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कळ्या लागण्यास सुरुवात होते. एकूण ४ ते ५ महिने (फेब्रुवारी ते जून) फुलांचा बहर असतो. खते देताना साधारणत: १० किलो कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम मिश्रखत आणि २५० ते ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत (झाडाच्या वयोमानानुसार) द्यावे व हलकेसे पाणी द्यावे.
पाणी देणे :
मोगऱ्याला पाणी भरपूर लागत नसले तरी जमिनीनुसार उन्हाळ्यात चौथ्या दिवशी व हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांनी पाणी देताना बांगडी पद्धत वापरावी. पाणी अधिक दिल्यास निचरा न झाल्याने पाने पिवळी पडून विकृती येते आणि मर होण्याची शक्यतो असते.
काढणी :
मोगऱ्याला लागवडीच्या पहिल्या वर्षीच काही प्रमाणात फुले येतात. त्यानंतर पुढील वर्षी फुलांचे उत्पादन वाढते. तिसऱ्या वर्षापासून फुलांचे भरपूर उत्पादन मिळते. सर्वसाधारणपणे फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत फुलांचा हंगाम असतो. संक्रांतीपासून कळ्यांना चांगलाच बहर असतो. योग्य व्यवस्थापन व फवारण्या केल्यास ऐन डिसेंबरमध्ये मोगरा येऊन पुढील दिवाळीपर्यंत मोगऱ्याच्या कळ्या निर्यात करता येतात.
कळी खुडतांना घ्यावयाची काळजी: चांगली फुगलेली, लांब व घट्ट अशी कळी खुडावी. नियमित काळ्या खुडल्यामुळे मागील येणाऱ्या कळ्या लवकर मोठ्या होतात. कळी खुडताना प्लॅस्टिकच्या पिशवीत जमा करावी. कारण कळ्या अंगाच्या उष्णतेमुळे उमलतात व पिवळ्या पडतात. मुलींनी, स्त्रियांनी कळ्या ओटीत जमा करू नयेत. प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरल्याने कळ्या व्यवस्थित राहतात. व पिवळ्या पडत नाहीत. निर्यातयोग्य राहतात.
कळी खुडणे :
मोगऱ्याच्या कळ्या रोजंदारीने न खुडता प्रति किलो मजूर उपलब्धतेनुसार १० ते १२ रुपये प्रमाणे खुडतात. मोगरा सकाळी सुर्योदयापुर्वी खुडावा. लहान मुलांना अशाप्रकारे शिक्षण देऊन आपण त्यांना ५० ते १०० रुपये मिळवून देऊ शकतो. म्हणजे ‘कमवा आणि शिका’ (अर्न व्हाईल लर्न) ही कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिकवण सार्थ ठरेल. सर्व कळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीतच खुडून घ्याव्यात.
उत्पन्न :
मोगऱ्याला पहिल्यावर्षी कमी कळ्या लागतात परंतु दुसर्या वर्षापासून भरपूर कळ्या लागून उत्पन्न वाढते. प्रत्येक झाडास कमीत कमी २० ग्रॅम एका वेळेस कळ्या लागतात.
दुसऱ्या वर्षापासून डिसेंबर महिन्यात छाटणी केल्यानंतर जमिनीची चाळणी करून शेणखत २ किलो किंवा कल्पतरू ५०० ग्रॅम + मिश्रखत १५० ग्रॅम देऊन पाणी द्यावे. प्रथम कमी पाणी द्यावे व ३ – ४ दिवसांनी भरपूर पाणी दिल्यास भरपूर फुट येऊन कळ्या बाहेर पडतात. अगोदर दिल्याप्रमाणे फवारण्या केल्यास भरपूर उत्पन्न मिळते. पहिल्या वर्षी १ ते १.५० किलो प्रत्येक झाडाला निघणारा मोगरा, पाचव्या वर्षी पाच किलोपर्यंत एकूण हंगामात निघतो.
प्रक्रिया उद्योग :
भावी काळात मोगऱ्याची लागवड फार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. मोगऱ्याची फुले ही नाशवारंत असल्याने निर्यातीचे बाजर खाली आल्यास नाशवंत फुलांची निर्यात परवडणार नाही. समाज भाव कमी अधिक झाले तर इतर व्यवस्था, जसे प्रिकुलींग , अनियमित विधुत पुरवठा, युद्ध, नैसर्गिक आपत्ती (चक्रीवादळ, गारांचा पाऊस), विमानसेवा रद्द होणे वे उशीरा असणे, यामुळे फुले सडतील व प्रचंड तोटा होईल. समजा वरील सर्व गोष्टी अनुकूल असल्या तरी एक टन मोगरा निर्यात करण्यासाठी आवश्यक बाबींचा खर्च लक्षात येईलच तेव्हा आपण एक टन मोगऱ्याच्या फुलापासून एक किलो उत्तर काढले तर दोन लाख रुपये व अधिक भाव मिळून वरील सर्व बाबींचा खर्च टाळता येतील व नैसर्गिक फुलांची सुगंधी तेले यालाच जगात प्रचंड मागणी राहील. हल्ली बाजारात उपलब्ध असलेली कृत्रिम तेले काळाच्या पडद्याआड लोप पावतील. या सदंर्भात फ्रान्स, जर्मनी, इटली, इंग्लंड, अमेरिका, हॉलंड ही राष्ट्रे नैसर्गिक गोष्टींचा अवलंब करत आहेत.
मोगऱ्यातील आशादायी आंतरपिके :
आपणा मोगऱ्यामध्ये आंतरपीक म्हणून पहिल्या वर्षी बटाटा (खरीप) बीट, गाजर, कोथिंबीर, शेपू व आंबट चुका ही पिके घेऊन बऱ्यापैकी उत्पन्न या पिकांपासून मिळवून ते पैसे आपण मोलमजुरी व खुरपणीसाठी वापरू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
चंद्रकांत पाटील यांना काहीही बोलण्याची सवय आहे- अजित पवार
साखर उद्योगाला सरकारनं मदत करणं अशक्य आहे; पर्यायाचा विचार करा – गडकरी