जाणून घ्या पशुधनास पोषक आहार

पशुसंवर्धनाचा शेतकर्‍यांच्या शेतजमिनीत उपलब्ध असलेल्या चारा हा एक सर्वात महत्वाचा घटक आहे. जर शेतकर्‍यांकडील पशू हे उत्पादन देणारे असतील, तर त्या पशूंसाठी सर्वांत महत्वाचे म्हणजे समतोल व पूरक आहार योग्य प्रमाणात द्यावा लागतो. दूध उत्पादनामध्ये गाईला ताजे गवत द्यावे आणि पूरक प्रमाणात प्रथिने दिली गेली पाहिजेत. त्यासाठी अतिरिक्त खाद्य द्यावे लागते. याचप्रमाणे काम करणार्‍या पशूलाही समतोल व पूरक आहार द्यावा.

जनावरांना कोणत्याही एका प्रकारच्या चार्‍यातून अथवा खाद्यातून त्यांच्या शरीराला आवश्यक पोषणमूल्ये योग्य प्रमाणात पुरवता येत नाहीत. त्यामुळे विविध खाद्यघटकांचा समावेश असणारा चारा आणि खुराक खाऊ घातल्यास आवश्यक ती पोषकद्रव्ये योग्य त्या प्रमाणात पुरवली जाऊ शकतात. ही खाद्ये त्यांच्यातील वैशिष्ट्यानुसार निरनिराळ्या गटांमध्ये विभागली जातातल. ही विभागणी मुख्यत: त्यातील उपलब्धतेनुसार करण्यात येते. एखाद्या गटातील एखादा खाद्यघटक जर उपलब्ध नसेल, तर त्याच गटातील दुसरे खाद्य वापरले जाऊ शकते. खाद्याचे प्रामुख्याने चारा व खुराक खाद्य असे वर्गीकरण केले जाते.

चारा व खुराक:

चारा व खुराक ही वर्गवारी त्यामध्ये असणार्‍या दृढ तंतूच्या प्रमाणावर केली जाते. वाळलेल्या चार्‍यांमध्ये दृढ तंतूंचे प्रमाण 58 टक्के किंवा अधिक असून, पोषकद्रव्याचे प्रमाण कमी असते. निकृष्ट प्रतीच्या चार्‍यांमध्ये लिग्नीन नावाच्या न पचणार्‍या पदार्थाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे इतर खाद्याची पाचकतासुद्धा कमी होते. खुराकात दृढ तंतूंचे प्रमाण 18 टक्क्यांपेक्षा कमी असून, त्यात ऊर्जा किंवा प्रथिने जास्त प्रमाणात असतात.

अ. चारा (वैरण):

चारा हे जनावरांचे प्रमुख खाद्य असून, तो हिरवा किंवा वाळलेला असतो. चार्‍यांचे वर्गीकरण त्यामध्ये असणार्‍या पचनीय प्रथिनांच्या प्रमाणावर केले जाते.

1) शरीरपोषणास उपयोगी चारा: या चार्‍यांत प्रथिनांचे प्रमाण 3 ते 5 टक्के असून, असा चारा जनावरांना खुराकाव्यतिरिक्त खाऊ घातला असता त्यांच्या शरीरास लागणारी पोषणद्रव्ये मिळतात. त्यामुळे त्यांचे वजन कमी किंवा जास्त न होता स्थिर राहते. उदा. हिरवी ज्वारी, हिरवा मका, ओट इत्यादी.

2) शरीर पोषणात उपयोगी न पडणार चारा : या चार्‍यांमध्ये पचनीय प्रथिनांचे प्रमाण 3 टक्क्यांपेक्षा कमी असते. त्यामुळे गुरांना जर असा चारा खुराकाव्यतिरिक्त खाऊ घातला, तर गुरांचे वजन हळूहळू कमी होते. कारण, या चार्‍यांमधून शरीराला लागणारी पोषणद्रव्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. उदा. तणस, गव्हांडा, कडबा, कुटार इत्यादी.

3) उत्पादनास उपयोगी चारा: ज्या चार्‍यांत पचनीय प्रथिनांचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा जास्त असते आणि असा चारा खुराकाव्यतिरिक्त विपुल प्रमाणात खाऊ घातला, तर जी गुरे 5 ते 8 लिटर दूध देतात, त्यांचे उत्पादन टिकून राहते. उदा. बरसीम, ल्युसर्न, सुबाभूळ इत्यादी हिरवा चारा.

ब. खुराक खाद्य:

1) धान्य: धान्यामध्ये पिष्टमय पदार्थ जास्त असल्यामुळे ऊर्जेचे प्रमाण अधिक असते व प्रथिने कमी असतात. उदा. मका, ज्वारी, गहू, तांदूळ इत्यादी.

2) द्विदल धान्य: या प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. उदा. तूर, हरभारा, मूग इत्यादी.

3) तेलबिया: यात तेलाचे व प्रथिनांचे प्रमाण जास्त असते उदा. जवस, भुईमूग, तीळ, सुर्यफूल, करडई, सरकी इत्यादी.

जनावरांना चार्‍यांची गरज:

1) स्वत: च्या शरीरासाठी: जनावरांना स्वत:च्या शरीरासाठी म्हणजे जीवनमान सांभाळण्यासीठी खाद्य लागते. खाद्यामुळे शरीराचे तापमाण स्थिर राखले जाते. दैनंदिन जीवनात शरीराच्या पेशींची होणारी झीज भरून निघते आणि शारीरिक गरजा पूर्ण होतात.

2) उत्पादनासाठी किंवा कार्यशक्तीसाठी: जनावरांपासून उत्पादन म्हणजे दूध, मांस, अंडी, लोकर उत्पादनासाठी वैरणीची गरज असते.

जनावरांच्या चार्‍याचे प्रकार:

1. वैरण

अ. कडधान्यांची वैरण:

वाळलेली वैरण: कडधान्यांच्या पिकाची, वाळलेली पाने, पाचोळा, खोड यांचा सामावेश होतो. उदा. तूर, हरभरा, वाटाणा इ.
हिरवी वैरण: कडधान्यांच्या हिरव्या वैरणीत ल्युसर्न, बर्सिम, चवळी, गवार ही पिके येतात. ही वैरण गुरांना अतिशय पोषक असते या वैरणीमुळे दूध उत्पादन वाढते. या वैरणीमध्ये प्रथिनांचे व एकूण अन्नघटकांचे प्रमाण अनुक्रमे 3.5 व 12.5 टक्के असते. जनावरांच्या आहारामध्ये या वैरणीचा जरूर समावेश करावा.

ब. तृणधान्यांची वैरण:

वाळलेली वैरण: ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, ओट अशा पिकांपासून धान्य मिळाल्यानंतर राहिलेल्या वाळलेल्या भागाचा वैरण म्हणून वापर केला जातो. यामध्ये ज्वारी, बाजरी, ओट ही चांगली वैरण आहे.
हिरवी वैरण: हिरवा मका, ज्वारी व इतर गवतांचा यामध्ये सामावेश होतो. हिरवा मका, ओट ही सर्वात चांगली वैरण आहे. कारण यामध्ये प्रथिनांचे व एकूण अन्नघटकांचे प्रमाण अनुक्रमे 1.2 व 1.6 टक्के असते, तसेच ही वैरण पशूंना अधिक आवडते. याशिवाय नेपियर, गावरान, गिनी गवत, सुदान गवत, दीनानाथ, पैराघाम इ. हिरवी वैरण दुभत्या पशूंना खाऊ घालतात. पशूंना त्यांच्या वजनाच्या 2.5 टक्के चारा लागतो.

2. खुराक:

ज्या खाद्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण 18 टक्क्यांहून कमी असते, प्रथिनांचे व अन्नघटकांचे प्रमाण जास्त असून, त्याची पचनक्षमता जास्त असते. खुराकामध्ये मुख्यत: तेलबियांपासून तेल काढल्यानंतर जो चोथा उरतो त्यास पेंड म्हणतात. या पेंडीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो.

शेंगदाणा पेंड: सर्वात अधिक प्रथिने 50 टक्क्यांपर्यंत असतात.
सरकी पेंड: प्रथिनांचे प्रमाण 12 ते 20 टक्के असून, 72 टक्के एकूण अन्नघटक असतात. ही पेंड पैदाशीच्या वळून खाऊ घालू नये.
जवस पेंड: ही पेंड पचनास हलकी असून, तीत 25 टक्के प्रथिनांचे प्रमाण असते. ही पेंड वासरांना खाऊ घालू नये.
करडई पेंड: यात प्रथिनांचे प्रमाण 20 टक्के असून ती बैलाकरिता फार उपयोगी आहे.

खुराक तयार करण्यासाठी खालील घटकांचा वापर करावा:

गव्हाचा कोंडा- 40 टक्के
तूर चुनी- 20 टक्के
भुईमूग पेंड- 20 टक्के
सरकी पेंड- 20 टक्के

अशा रीतीने तयार केलेला खुराक 12 तास पाण्यास भिजवून पशूंना खाऊ घालावा. यामुळे गाईमधील दूध उत्पादन वाढून त्यात सातत्य टिकवून ठेवले जाते.

जनावरांच्या प्रकारानुसार खाद्य देण्यात यावे:

कालवडी व गाईंसाठी खाद्य:
साधारणपणे 2 ते 4 महिन्यांच्या वयापर्यंत पाव किलो, 4 ते 9 महिन्यांपर्यंत अर्धा किलो, 9 ते 21 महिन्यांपर्यंत एक किलो व त्यानंतर दीड किलो खुराक द्यावा. त्या 1 टक्का मीठ टाकावे. दोन ते नऊ महिन्यांच्या वासरांना 5 किलो वैरण द्यावी. नऊ महिन्यांपेक्षा जास्त वय असलेल्या वासरांना 12 ते 15 किलो हिरवी वैरण व 6 ते 8 किलो कोरडी वैरण द्यावी.
दुभत्या गाईकरीता खाद्य:
गाय व्यायल्यानंतर पहिले चार दिवस साधारणपणे दोन किलो गव्हाचा कोंडा, दीड किलो गूळ, दोन टक्के मिळाचे द्रावण द्यावे. तसेच गाईला याव्यतिरिक्त अंदाजे 5 किलो हिरवी वैरण व 5 किलो कोरडी वैरण द्यावी. 5 ते 10 दिवसांपर्यंत दीड किलो खुराक द्यावा व 10 ते 15 किलो हिरवी वैरण द्यावी.
दुभत्या म्हशीसाठी:
म्हशीला चारा गाईप्रमाणे द्यावा. फक्त खुराकाचे प्रमाण मात्र पुढीलप्रमाणे द्यावे. शरीर पोषणासाठी दीड किलो आणि प्रत्येक दोन लिटर दूधासाठी एक किलो खुराक द्यावा.
वळूकरिता खाद्य: सरासरी 5 ते 6 किलो वाळलेली वैरण व 21 ते 30 किलो हिरवी वैरण द्यावी. त्यासोबत 2 किलो खुराक द्यावा.
बैलाकरिता खाद्य: एक किलो खुराक सोबत 5 ते 6 किलो वाळलेली वैरण आणि 22 ते 30 किलो हिरवी वैरण द्यावी.

जनावरांसाठी पोषक अन्नधान्य:

प्रथिनांनी परिपुर्ण अन्नधान्य:
प्रथिनांमुळे जनावरांची वाढ लवकर होते आणि गाय दूध जास्त देते. त्याचप्रमाणे काम करणार्‍या बैलांना व गाभण गाईला प्रथिनांची गरज जास्त असते. उदा. सुबाभळीची पाने, सुबाभळीच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगांच टरफले, सरकी पेंड, चवळी, हरळी, तूर, तांदूळ, तिळाची पेंड, सोयाबीन, गव्हाचा भुसा इ.
कार्बोहायड्रेटनी परिपूर्ण अन्न:
कार्बोहायड्रेट हे ऊर्जा पुरविण्याचे काम करते, तसेच ते कष्टाचे काम करणार्‍या जनावराला जास्त प्रमाणात आवश्यक असते. उदा. तांदळाची चुनी, मका, शेंगदाणा पेंड, तुरीची पाने, तुरीच्या शेंगा, ज्वारीचा धांडे, ऊस इ.
खनिजांनी परिपूर्ण अन्न:
खनिज हे भागण गाईसाठी दुभत्या गाईसाठी तसेच जनावरांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. उदा. वाल, जवस, मासोळ्याची भुकटी, तांदळाचा भुसा, मीठ इ.

खाद्य देताना घ्यायची काळजी:

जनावरांचा कडबा नेहमी कुट्टी करून खाऊ घालावा. त्यामुळे उपलब्ध कडब्याचा साठा जास्त दिवस पुरून मुल्यवान कडब्याची नासाडी होत नाही.
उन्हाळ्यात कोरडा चारा देताना सोबत साधारणपडे 50 ग्रॅम मीठ द्यावे.
पेंड किंवा भरडा देताना 8-10 तास आधी पाण्याने थोडा ओलसर करून द्यावा म्हणजे चविष्टपणा आणि पाचकता वाढते.
खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे रोग टाळण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी खनिज मिश्रण जनावरांना दररोज 20 ग्रॅम द्यावे.
ऊसाच्या वाढ्याचा जास्त वापर करू नये. कारण, यामध्ये अ‍ॅक्झिलीक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. अ‍ॅक्झिलीक अ‍ॅसिडची हाडातील कॅल्शियम बरोबर संयोग होऊन त्यापासून कॅल्शियम ऑक्झिलेट तयार होते. त्यामुळे जनावरांच्या शरीराची झीज होते. त्यामुळे त्याचा वापर कमी प्रमाणात करावा, आता ऊसाच्या वाढ्यापासून मुरघास बनविता येतो.