तब्बल ४७ लाखांहून अधिक लोकांनी लावली १९ कोटींहून अधिक झाडे

राज्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून आतापर्यंत वन विभागाबरोबर राज्यातील ४७ लाख ५९ हजार ४१२ व्यक्तींनी सहभाग नोंदवत १९ कोटी ३९ लाख ८५ हजार २८८ झाडं लावली आहेत. संकल्पाच्या ५८.७८ टक्के वृक्षलागवड राज्यात झाली असून आता वृक्षलागवड हा केवळ शासकीय उपक्रम न राहता ती खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

लोकसहभागाचा चढता आलेख

हरित महाराष्ट्राच्या निर्मितीचं पहिलं छोटं पाऊल पडलं ते शाळांमधील वृक्षलागवडीतून.वन विभागाने १५ ऑगस्ट २०१५ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील शाळांमधून कमीत कमी २० झाडं लावण्याचे आवाहन केले आणि या एका दिवशी राज्यात ३० लाख झाडं लागली. १ जुलै २०१६ ला २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प २ कोटी ८२ लाख रोपे लागून पूर्णत्वाला गेला.एक दिवसात करावयाच्या या वृक्षलागवडीत सहा लाख लोक सहभागी झाले. वृक्षलागवडीचं बीज मनामनात रुजवण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. तो यशस्वी झाला. त्यानंतर १ जुलै ते ७ जुलै २०१७ या वनसप्ताहात चार कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प ५ कोटी ४३ लाख वृक्ष लावून पूर्णत्वाला गेला. यात १६ लाख लोकांनी सहभाग नोंदवत हरित महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान दिले. त्यानंतरचा महत्वाचा टप्पा होता तो १३ कोटी वृक्षलागवडीचा. १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प १५ कोटी ८८ लाख रोपे लावून पूर्ण झाला. या वृक्षलागवडीला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि तब्बल ३६ लाख लोकांनी यात सहभाग नोंदवला. शालेय विद्यार्थ्यांपासून सुरु झालेले वृक्षलागवडीचे हे मिशन खऱ्या अर्थाने लोकांचे मिशन झाले आणि त्या सर्वांनी एकत्र येत वन विभागाबरोबर हरित महाराष्ट्राचे हे ‘वृक्ष धनुष्य’ उचलण्यात हातभार लावला.

एक कोटीहून अधिक लोक सहभागी होतील

५० कोटी वृक्षलागवडीतील तिसरा आणि अखेरचा टप्पा आता १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत पूर्ण होत आहे. या वृक्षलागवडीत आतापर्यंत ४७ लाखांहून अधिक लोकांनी एकत्र येत १९ कोटींहून अधिक झाडं लावत राज्यात ‘वृक्षोत्सव’ साजरा केला आहे. या वृक्षलागवडीत एक कोटींहून अधिक लोक सहभागी होतील असा विश्वास वनमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

वृक्षलागवडीतील पहिले पाच जिल्हे

या पावसाळ्यात आतापर्यंत झालेल्या वृक्षलागवडीत नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर असून येथे १ कोटी ३२ लाख ६८ हजार ९३० वृक्ष लागले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्हा असून येथे १ कोटी १८ लाख ११ हजार ७३२ वृक्ष लागले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा असून येथे ९७ लाख ३२ हजार ८६२ वृक्ष लागले आहेत. चौथ्या क्रमांकावर नांदेड जिल्हा असून येथे ९६ लाख ७२ हजार ९०६ वृक्ष लागले आहेत. पाचव्या क्रमांकावर गडचिरोली जिल्हा असून येथे ९२ लाख ९१ हजार ४९३ झाडं लागली आहेत.

महत्वाच्या बातम्या –

ई पॉस मशीन धान्य वितरणामुळे ३.६४ मे. टन धान्याची बचत

‘सरपंच वाटिके’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण