गोदावरीला आलेल्या पुरामुळे वैजापूर तालुक्यातील १७ तसेच गंगापूर तालुक्यातील ९ वाड्या वस्त्यांमध्ये पाणी घुसले होते. पुराचा धोका ओळखून वैजापूर तालुक्यातील ९४२, तर गंगापूर तालुक्यातील ३८९ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. पुराच्या पाण्यामुळे वैजापूर तालुक्यात नदीकाठची अंदाजे तीन हजार हेक्टरवरील शेतातील पिके ही पाण्याखाली गेली.
गोदावरी नदीचा पूर आता ओसरला आहे. पण या पुरामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी नुकसान झालेल्या शेती, मालमत्ता आणि इतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश हे प्रशासनाने दिले आहेत. तसेच गुरुवारी (ता. ८) पूर ओसरल्यानंतर किती शेतीपिके पाण्याखाली जाऊन नुकसान झाले, यासोबतच पुरामुळे शासकीय, खासगी मालमत्तेचे किती नुकसान झाले, या सर्व गोष्टींचे पंचनामे येत्या तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. शिवाय पूरग्रस्तांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याचे कामही सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
त्याचप्रमाणे गंगापूर तालुक्यातील स्थलांतरित ३८९ लोकांची विविध ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या जेवणाची, आवश्यक धान्य पुरविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या –
पूरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत – एकनाथ शिंदे
खेड घाटातील बाह्यवळण कामे लवकर पूर्ण करा ; अमोल कोल्हेंच्या अधिकाऱ्यांना सूचना
शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात