सध्याच्या कृत्रिम साखरेच्या अतिवापराचे दुष्परिणाम लक्षात घेता मधुपर्णी (स्टीव्हिया) या नैसर्गिक साखरेच्या स्रोतापासून निर्माण केलेले आणि आवळा आणि कोरफड यांच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग लक्षात घेता तयार केलेले पेय हे विविध प्रकरच्या आजारांवर अत्यंत लाभकारी ठरणार आहे. आवळा हे एक खनिजांचा आणि जीवनसत्वांचा विशेषतः जीवनसत्व ‘क’ चा एक मोठा स्रोत आहे. या मुळे आवळा आरोग्याच्या दृष्टीकोनातून मानवी आरोग्यास फायदेशीर आहे. त्याच प्रकारे कोरफड सुद्धा एक बहुमूल्य औषधी वनस्पती आहे.
कोरफडीचा गर हा विविध प्रकारच्या रोगांवर गुणकारी आहे. आवळा आणि कोरफड या दोन्हींच्या गरा पासुन बनविलेले औषधी पेय हे एक चांगल्या प्रकारचे एटींऑक्सिडेंट चे कार्य करते. त्यामुळे मानवी शरीरातील रक्त घटकांना योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करते. यामुळे विविध प्रकारच्या आजारांवर मानवी शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यास हे पेय फायदेशीर ठरणारे आहे.
गुणधर्म:
मधुपर्णी (स्टीव्हिया) हि एक विलक्षण औषधी वनस्पती असून मधुपर्णीच्या पानांपासुन निर्माण केलेली साखर हि मानवी शरीरामध्ये कमी कर्बोदके निर्माण करून कॅलरीजचे योग्य प्रमाण राखण्यात महत्वपूर्ण जबाबदारी बजावते यामुळे मधुमेहींच्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.
मधुपर्णी (स्टीव्हिया) च्या साखरेचा गोडवा हा साधारण साखरेच्या 200-300 पट जास्त असल्यामुळे तिचा कमी प्रमाणात केलेला वापर हा अधिक गोडवा निर्माण करतो त्यामुळे कोलेस्टेरोल वाढीवर निर्बंध लागतात, यामुळे हि औषधी वनस्पती ह्रदयरोगींसाठी वरदान ठरत आहे.
काही शास्त्रज्ञानीं वैद्यानिकदृष्ट्या अभ्यास केला असता त्यांना असे आढळून आले कि, मधुपर्णीच्या वनस्पतीच्या पानांमध्ये असलेले स्टीविओसाईडचे आणि रिबोडायोसाईड या विशिष्ट घटकांमुळे स्वादुपिंडाच्या कॅन्सरची भीती 23% घटते, तसेच रक्तप्रवाह आणि रक्ताचा दाब सुरळीत राखण्यात या घटकांचा वैशिष्ट्यपुर्ण फायदा होतो.
मधुपर्णी या औषधी वनस्पती मध्ये असलेल्या खनिजांच्या मुबलक प्रमाणामुळे हाडांच्या समस्यांमध्ये जसे कि, हाडांची ठीसुळता या प्रकारच्या आजारांमध्ये हि वनस्पती गुणकारी ठरते.
मधुपर्णी याऔषधी वनस्पतीच्या वापरामुळे शरीरातील कॅलरीजचे योग्य प्रमाण राखण्यात मदत होते यामुळे लठ्ठपणा आणी लठ्ठपणामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मधुपर्णी च्या पानांपासुन निर्माण केलेल्या साखरेचा आणी अन्नपदार्थांचा वापर हा अत्यंत गुणकारी ठरतो.
आवळा हे एक बहुमूल्य उपयोगी असे फळ असून आवळ्या मध्ये मुबलक प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्वाचा साठ असून मुख्यत्वे जीवनसत्व ‘क’ चा मोठा साठा आहे. ह्रदयाचे कार्य, त्वचेसंबंधीचे आजार, पचनक्रिया सुधारण्यासाठी आवळा अत्यंत लाभकारी ठरते.
कोरफड हि एक विलक्षण औषधी वनस्पती असून कोरफडीच्या गराचा उपयोग त्वचेसंबंधीचे आजार आणि मानवी शरीराची प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते.
औषधी पेय तयार करण्याची पद्धत:
औषधी पेय तयार करण्यासाठी लागणारी सामग्री (प्रती 100 मि. ली)
आवळ्याचा गर- 70 मिली
कोरफडीचा गर- 30 मिली
मधुपर्णी (स्टीव्हिया) ची साखर- 0.14 मिली
सायट्रिक एसिड- 0.3%
सोडीयम बेन्झोएट- 0.1%
प्रक्रिया:
सर्वप्रथम चांगल्या प्रतीचे आवळे आणि कोरफडीचे पाने घेऊन पाण्याने स्वच्छ करून घ्यावे त्यानंतर आवळ्याचा आणि कोरफडीचा गर काढून घ्यावा. हा गर 20% प्रमाणात घेऊन त्यात मधुपर्णी (स्टीव्हिया) ची साखर, सायट्रिकएसिड, सोडीयम बेन्झोएट वरील दर्शिवलेल्या प्रमाणे मिश्रण एकत्र करून घ्यावे, तयार केलेले मिश्रण एका भांड्यात मंद आचेवर गरम (निर्जंतुक) करून काचेच्या बोटलमध्ये हवाबंद करून थंड करून फ्रिज मध्ये साठवून ठेवावे.