देशाला अभिमान वाटेल असे क्रीडा विद्यापीठ उभारणार – सुनिल केदार

पुणे – जागतिक अंतरावरील सर्वोत्तम अभ्यासक्रम असलेले आणि देशाला अभिमान वाटेल असे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा आणि युवक  कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे म्हाळुंगे-बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रच्या नियामक परिषद सदस्यांच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा  व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया  उपस्थित होते.

श्री.केदार म्हणाले, नियामक परिषदेतील सर्व सदस्य आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ क्रीडा विद्यापीठासाठी होईल. जगाने कौतुक करावे असे आणि महाराष्ट्राच्या नावलौकीकात भर घालेल असे क्रीडा विद्यापीठ उभारायचे आहे. त्यात खेळाडूंसाठी सर्वोत्तम अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. त्या संदर्भात युजीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. सर्व अडचणींवर मात करीत महाराष्ट्राचे नाव उंचावणारे विद्यापीठ उभे करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून उत्तम खेळाडूंसोबत चांगले मार्गदर्शक घडविले जातील असा निश्चय त्यांनी व्यक्त केला.

श्रीमती कृष्णा म्हणाल्या, क्रीडा क्षेत्रातील रोजगाराच्या संधीची माहिती युवकांना देण्यात यावी. क्रीडा विद्यापीठातील अभ्यासक्रम आणि सुविधांविषयी सोप्यारितीने माहिती देण्यात यावी.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे मत  नियामक परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केले. पुढील 5 वर्षाचा विचार करून जागतिक स्तराचे विद्यापीठ व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बैठकीस भारतीय संघाचे माजी गोलकीपर व तांत्रिक समितीचे उपाध्यक्ष हेन्री मेनेझिस, आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू राहुल बोस, सिम्बॉयसिसच्या प्र.कुलगुरू विद्या येरवडेकर, प्रा.रत्नाकर शेट्टी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे, सहसंचालक चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –