भिवंडी मध्ये ट्रॅफिक जॅम झालं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्याच गाड्या होत्या त्याच्यातून वाट काढत मी आणि मीनाक्षी जात होतो. ठाणे शहर १ किलोमीटर राहिलं होतं . शेतकरीही गाड्यांना जागा करून देत होते या वाहतूक कोंडीत अनेक शाळकरी मुलं ही अडकले होते त्यांची शाळा सुटून २ तास झाले होते. मोर्चा पाहून ते ही मोर्चाला गाडीतून काका लाल सलाम असं ओरडत होते तर शेतकरी ही त्यांना आपुलकीने लाल सलाम म्हणत पुढं जात होते. ठाणे जवळ-जवळ येत होतं रस्त्याला राजकीय पक्षांचे लोक स्वागताला थांबले होते. कोणी पाणी तर कोणी चहा देत होत. शेतकरी १४० किलोमीटर चालत आले आहेत याच कौतुक ठाणेकर करत होते. आपुलकीने शेतकऱ्यांना विचारत होते सकाळी घातलेली टोपी शेतकऱ्यांच्या डोक्यात रात्री पर्यंत तशीच होती. मी ही त्यांच्या बरोबर चालत असल्याने माझ्या अंगातील निळा शर्ट त्यांच्या टोपी सारखा वाटत होता. आतापर्यंत सरकार किती निर्दयपपणे वागत आलं आहे याचा जाब सरकारला हे शेतकरी विचारणार होते. ठाण्यात अनेक चौकात राजकीय पक्ष मंडप टाकून बसले होते. आधी सेनेचा बॅनर लागलेला होता त्या ठिकाणी सर्व थांबले स्थानिक लोक मदत करत होते. अशातच आदिवसी युवक जवळ आला आणि विचारलं… ही इमारत किती मोठी आहे, लोकं कसे वर जातात. मी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगतीलं इमारतीला लिफ्ट आहे कोणत्या मजल्यावर जायचं ते बटन दाबलं की जात, हे मला नवीन नव्हतं पण त्या तरुणासाठी नवीन होत रस्त्याने अनेक मॉल मोठी दुकान, लाईटच्या झगमगाटाला ही लोक पाहत होते मी त्यांना विचारलं अस पाहिलं आहे का कधी? त्यावेळी तो युवक म्हणाला नाशिक मध्ये नाही एवढं मोठं हे खूप मोठं आणि वेगळं आहे.
आम्ही बोलत बोलत पुढं जात होतो. जशी रात्र होईल तशी ओबी ड्रायव्हर विनोद पाटील यांचा १०० च्या नोटेचा किस्सा आठवत होता. मोर्चा सर्व्हस रोडने पुढं जात होता. रात्रीचे १० वाजत आले होते. मुक्काम ठिकाण यायला वेळ होता, पण रस्त्यात राजकीय पक्ष स्वागत करत आहेत ते स्वागत स्वीकारत मोर्चा सुरू होता. आदिवासी शेतकरी लोक दमले असतील असं वाटायला लागलं. अनेकांच्या चप्पलाही रस्त्यात तुटल्या होत्या. काही लोक अनवाणी पायाने चालतात हे पाहून एका युकाच्या ग्रुपने काही शेतकऱ्यांना चप्पल वाटप केल्या.
मोर्चाच्या स्वागताला राज्यमंत्री आले होते. अनेकांची भाषण सुरू झाली भाषण संपता-संपता साडे अकरा वाजले होते. भाषण संपली मोर्चा मुक्कामाच्या ठिकाणी पोहचला. आम्ही मोर्चा बरोबर आहोत हे आमच्या ठाण्याच्या रिपोर्टरला माहीत होतं. गणेश थोरात आमचे सहकारी व त्यांचे मित्र तेही मोर्चा मुक्कामी असेलेल्या ठिकाणी आले होते. आनंदनगर जकात नाका येथे मोर्चाचा मुक्काम होता. सर्व शेतकरी बांधव आपल्या गावच्या तंबूकडे जेवण करण्यासाठी जात होते. मी आणि सुशांत त्यांच्या बरोबर फिरत होतो. आमचं काम संपलं होत मुक्काम कुठं करायचा हा प्रश्न पडला. रात्रीचे २ वाजले होते मात्र झोप झाली नव्हती. आता झोपलं पाहिजे असं आमचा ड्रायव्हर राजू म्हणाला कारण तोही खूप वैतगला होता. त्याच्या घरून त्याची २ वर्षाची मुलगी सारखी आठवण काढत आहे, असा फोन येत होता.
आमच्या तिघांच्या ही अंगावर एकच ड्रेस होता. दमट हवा असल्यामुळे पूर्ण शरीर घामान भरून गेलं होतं. झोप झाली पाहिजे असं त्याने सांगितलं पण मोर्चा दूर पासून जायचं नाही असं ठरवलं. ठाण्याचे प्रतिनिधी गणेश थोरात यांनी गेस्ट हाउस आहे असं सांगितलं. झोपण्याची व्यवस्था झाली आहे त्या ठिकाणी तुम्ही जा, अस सांगितल्यावर मी ही हो म्हटलं. कारण मला राजुला आणि सुशांतला अराम द्यायचा होता. आम्ही आणि ओबी घेवून सर्वजण ठाणे गेस्ट हाउसला गेलो. मात्र तिथं काहीच व्यवस्था नाही असं आम्हाला गेस्ट हाउस मधील कामगारांनी सांगितलं. यासर्व प्रकारात ३ वाजले होते. झोप ही डोळ्यावर होती आम्ही काही वेळ फ्रेश होतो आणि निघतो अस सांगितल्यावर १ तास गेस्ट हाउस आम्हाला मिळालं पण आम्ही आवरून लगेच निघालो ४ वाजत आले होते. मोर्चा मधील शेतकरी कसे झोपले असतील असा प्रश्न पडला. कारण डास मोठ्या प्रमाणत होते. गेस्ट हाउस वरून आम्ही मोर्चाच्या ठिकाणी. आलो सर्व लोक शांत झोपलेले होते कोणी या अंगावरून त्या अंगावर होत होत. कारण डास कानाजवळ घोंघावत होते. दिवस भर चालत आलेल्या या पायांना थोडी ही शांत झोप मिळत नाही मग आपण ही का झोपायचं अस मनात आलं.
मी गाडीत झोपललो कारण डास खूप होते आमच्या गाडीत ही डास शिरले झोप लागणार नाही असं वाटायला लागलं. मात्र दिवसभर ऊन डोक्यावर घेऊन चालत असणाऱ्या शेतकऱ्याला कसे दिवस काढावे लागत आहेत या सरकारच्या नाकर्तेपणामुळं हे शेतकरी आज रस्त्यावर डासांचा हल्ला सहन करत आहेत. हा डासांचा नाही तर या सरकारने केलेल्या अन्यायाचा हल्ला होता. ज्या ठिकाणी मुक्काम होता त्याठिकाणी पालिकेने डास फवारणी केली असती तर एवढा त्रास त्यांना झाला नसता. पण या सरकारला किंवा पालिकेला कोण सांगणार. ज्यांचे प्रश्न आधीच सुटत नाहीत ते सरकार या लोकांसाठी काय करणार, अस मला वाटलं. सकाळचे ६ वाजत आले होते डोक्यात विचार सुरू होता मोर्चा ८ ला निघणार आहे, असं समजलं मात्र सर्व लोक झोपलेले होते. मोर्चा ११ ला निघणार अस समजलं. माझा मुंबई मधील सहकारी विनायक डावरूनग सकाळी मोर्चाच्या ठिकाणी पोहचला होता आता तो तिथं थांबणार होता आणि मी पुढं जाणार होतो.
आणि मी विक्रोळी ला पोहचलो….
( लेखक : सागर आव्हाड , पत्रकार TV ९ मराठी )