गवती चहा (शास्त्रीय नाव: Cymbopogon citratus; इंग्लिश: lemon grass;) ही मूलतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात.
जमीन व हवामान –
गवती चहासाठी निचरा होणारी, मध्यम काळी, पोयट्याची किंवा रेताड जमीन योग्य असते. या गवताच्या कठीणपणामुळे विविध प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत हे पीक घेता येते. तसेच, लाल व वालुकामय जमिनीत हे पीक चांगले येते. कारण त्यामध्ये मुळे उत्तम वाढतात, त्यातील सिट्रॉलचे प्रमाण वाढते.कॅल्शियमयुक्त जमिनित, तसेच ज्या ठिकाणी पाणी साचून त्याचा निचरा होत नाही, तिथे हे पीक घेवू नये.
गवती चहाला उबदार व उष्ण हवामान मानवते. भरपूर सूर्यप्रकाश व सम प्रमाणातपडणारा पाऊस गवती चहाच्या वाढीस पोषक असतो.
सुधारित जाती –
लागवडीसाठी सीकेपी-२५, ओडी-१९, ओडी-२३, ओडी-२५,ओडी-४४०, आरआरएल-१६, जीआरएल-१,प्रगती, प्रमाण, कावेरी, कृष्णा, चिरहरित व निमाया जातींची निवड करावी.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरीने सीकेपी-२५ या जातीची महाराष्ट्रासाठी शिफारस केलेली आहे. या जातीची पाने गर्द हिरव्या रंगाची, कमी रुंदीची, पाण्याचा ताण सहन करणारी व त्याचप्रमाणे सिट्रॉलचे प्रमाण जास्त असणारी आहे.
लागवड –
गवती चहाचे पीक एकदा लागवड केल्यानंतर ४-५ वर्षांपर्यंत जमिनीत रहाते. त्यासाठी लागवडी अगोदर चांगली मशागत करावी. जमिनीची उभी व आडवी नांगरट करून २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी एकरी ४-५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे.
गवती चहाची लागवड पाण्याची उपलब्धता असल्यास वर्षभर करता येते.लागवड बिया किंवा गवती चहाच्या आलेल्या नवीन फुटव्यापासून करता येते. फुटव्यापासून केलेली लागवडीची वाढ जोमाने होते. गवती चहाला एका वर्षानंतर अनेक फुटवे येतात. असे फुटवे कुदळीने खणून काढावेत. चांगल्या रोगविरहित फुटव्यांची शेतात ६०बाय ६० सें.मी.किंवा ७५ बाय ६० सें.मी. किंवा ७५ बाय ७५ सें.मी. अंतरावर लागवड करावी.फुटव्यांची लागवड करण्यापूर्वी २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर हे जीवाणू संवर्धक अर्धा लिटर पाण्यात मिसळून त्याचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण पाण्यात टाकून त्यात रोपांची मुळे बुडवून घ्यावीत. लागवड करताना जमिनीत पुरेसे पाणी आहे अशी खात्री करून घ्यावी.
अन्न्यद्रव्ये व पाणी व्यवस्थापन –
या पिकासाठी माती परीक्षणानुसार खतांचा वापर करावा. लागवडीच्या वेळी एकरी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद, २० किलो पालाश द्यावे. प्रत्येक काढणीनंतर एकरी२० किलो नत्राचा हप्ता द्यावा व ताबडतोब पाणी द्यावे.
जमिनीचा मगदूर, पिकाचे वय व ऋतुमानानुसार पाणी व्यवस्थापन करावे. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांनी व उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. उन्हाळ्यात पाण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पाण्याचा ताण बसल्यास तेलाचा उतारा कमी मिळण्याची शक्यता असते. पावसाळ्यात आवश्यकता असल्यास पाणी द्यावे. जमिनीत पाणी साठून राहिल्यास पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
पीक संरक्षण:
‘करपा’या रोगात पानांच्या कडांना व टोकांवर लालसर काळे ठिपके दिसून येतात. ‘गवत्या’ या रोगात वनस्पतीची वाढ खुंटते व गवतासारखी दाट वाढ होते. ‘काणी’ नावाच्या रोगात पानांवर काजळीसारखी भुकटी तयार होते तर ‘तंबोरा’ या रोगाची लागण झाल्यावर पानांवर लालसर ठिपके आढळून येतात. नंतर हे ठिपके फुटून नारंगी पावडर बाहेर पडते. बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव पावसाळ्यात जास्त आढळतो. वेळोवेळी काळजीपूर्वक निरिक्षण करून शिफारशींनुसार रासायनिक औषधांच्या फवारण्या घ्याव्यात.
पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळतो. रोपांची पूर्ण वाढ होईपर्यंत लागवड क्षेत्र खुरपणी करून तण विरहीत ठेवावे. म्हणजे लावलेल्या रोपांची योग्य वाढ होऊ शकेल. त्याचप्रमाणे प्रत्येक कापणीनंतर एक खुरपणी करावी. त्यामुळे वरची जमीन भुसभुशीत होते व मुळांना हवा मिळण्यास मदत होते. प्रत्येक कापणीनंतर मुळांना माती लावून घ्यावी. कारण मुळे जमिनीवर वाढण्याच्या गुणधर्मामुळे उघडी पडतात.उध्र्वपातन प्रक्रियेनंतर तेल काढलेल्या गवती चहाची पाने दोन ओळींमध्ये पसरून आच्छादन केल्यास तणास प्रतिबंध होतोच, त्याचबरोबर जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे पाण्याचीही बचत होते. कालांतराने या गवताचे नैसर्गिक खत तयार होऊन जमिनीत मिसळले जाते.लावणी केल्यानंतर पीक ४-६ वर्षे राहत असल्यामुळे मेलेल्या रोपांच्या ठिकाणी दुसरी रोपे ताबडतोब लावावीत.प्रत्येक पावसाळ्यापूर्वी गादीवाफे किंवा सऱ्या बांधणी करून घ्यावी.
कापणी व उत्पन्न –
लागवडीनंतर पहिली कापणी ५ ते ६ महिन्यांनी येते. नंतरच्या सर्व कापण्या २ ते ३ महिन्यांनी शक्यतो फुलोऱ्याआधी कराव्यात. या पिकाची कापणी धारदार विळ्याच्या साहाय्याने जमिनीपासून १५ ते २० सें.मी. अंतरावर करावी. कापणी केल्यानंतर आलेला पाला वजन करून घ्यावा व १ दिवस सावलीत वाळवून तेल काढण्यासाठी वापरावा. तेलांचे प्रमाण व प्रत कापणीची वेळ व पक्वता यावर अवलंबून असते. फुटव्याला साधारणत: पूर्ण वाढ झालेली ५ ते ६ पाने व फुटव्यांची उंची साधारणत: ३ ते ४ फूट असलेली अवस्था पिकाच्या कापणीस योग्य आहे.
पहिल्या कापणीला गवताचे उत्पादन प्रतिएकरी कमी मिळते. दुसऱ्या कापणीपासून ते वाढायला सुरुवात होते. तसेच पहिल्या कापणीतील गवतामधील तेलाचे प्रमाण व तेलातील सिट्रालचे प्रमाणसुद्धा कमी असते. दुसऱ्या कापणीपासून गवतातील तेलाचे प्रमाण व तेलातील सिट्रालचे प्रमाणसुद्धा वाढायला सुरुवात होते. पहिल्या वर्षी प्रतिएकरी७ ते ८ टन, दुसऱ्या वर्षी १० ते १२ टन, तिसऱ्या व चवथ्या वर्षी १५ ते १८ टन हिरवे गवत मिळते. नंतरच्या वर्षांत ते कमी कमी होत जाते. अशा वेळी पिकांचा फेरपालट करून पुन्हा लागवड करावी.
गवती चहाच्या पानात ०.४ ते ०.६ टक्के तेल असते. तेलाचे प्रमाण हवामानावर अवलंबून असल्यामुळे पावसाळ्यात पानातील तेलाचे प्रमाण कमी होते. इतर वेळी वाढते. गवती चहाचे तेल बाजारात ४५० ते ५०० रु. प्रतिकिलो दराने विकले जाते.
उपयोग –
ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. तेल हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत.कापणी केलेल्या गवतापासून एका तासाच्या अंतराने तेल काढावे.प्रती वर्षी एकरी १५ ते १८ टन ताज्या गवती चहापासून ९० लिटर तेलाचे उत्पादन मिळते.
तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे.सर्व प्रकारचे वेदनाशामक बाम, डासांपासून संरक्षण करणारी मलमे गवती चहापासून बनवतात.काही मिठाईमध्ये सुध्दा या तेलाचा उपयोग करतात. गवती चहाच्या तेलात ७५ ते ८५ टक्के सिट्रल हा महत्त्वाचा घटक असतो.यामध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असते. तेल रंगाने पिवळसर असून, त्याला लिंबासारखा वास असतो.सिट्रलपासून तयार केल्या जाणाऱ्या आयोनन या सुगंधी द्रव्याला अत्तरे तयार करणाऱ्या उद्योगांकडून चांगली मागणी असते. कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांतहोतो.साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात.
तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो.तसेच या चोथ्यापासून कंपोस्ट खत तयार करतात. या चोथ्यामध्ये उसाची मळी किंवा प्रथिनयुक्त आंबोण मिसळून जनावरांना चारा म्हणून उपयोग करतात. या पिकाच्या पाल्याला गुरे खात नसल्यामुळे जनावरांपासून त्रास होण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती नसते.
महत्वाच्या बातम्या –
साखर उद्योगाला सरकारनं मदत करणं अशक्य आहे; पर्यायाचा विचार करा – गडकरी