राज्य सरकारमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर हा महाराष्ट्र बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी

मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा हा ढोंगीपणा आहे. राज्य सरकारमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर हा महाराष्ट्र बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, असे आव्हान विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला दिले आहे.

उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांना चिरडलेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी प्रायोजिक आजच्या बंदमध्ये मविआ सरकारचा ढोंगीपणा समाजासमोर उघड झाला. हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरच्या घटनेकरिता महाराष्ट्रात बंद केला जातो. मात्र महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची मदत सरकार करत नाही.

महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने बांधावर जाऊन २५ हजार आणि ५० हजाराच्या केलेल्या घोषणा हवेत विरल्या, कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरल्या, मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, वेगवेगळी संकटं आली, त्यावेळी केलेल्या मदतीच्या घोषणा हवेत विरल्या. त्यांची लोकही म्हणतात, पूर्वीचं भाजप सरकार मदत करत होतं, पण हे सरकार मदत करायला तयार नाही. ही तीच मंडळी आहेत, ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का?, असा सवालही फडणवीस यांनी केला.

‘या सरकारचं नाव बंद सरकार आहे, हे सत्तेत आल्यानंतर यांनी योजना बंद केल्या, शेतकऱ्यांची अनुदानं बंद केली, कोरोना काळात देश उघडा होता, महाराष्ट्र बंद केला, आमचे छोटे दुकानदार, व्यावसायिक यांचे गाडे रुळावर येत असताना सरकारने बंद केला. धमक्या देऊन हा बंद केला जात आहे. या सरकारला थोडी नैतिकता असेल तर महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एखादं पॅकेज घोषित करतील अन्यथा यांचा ढोंगीपण अजून उघड होईल’, असे आव्हान फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.

महत्वाच्या बातम्या –