सुंदर लटपटे (वरिष्ठ संपादक) औरंगाबाद – आपल्या रक्ताचे नात्याचे भाऊबंद शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. या आत्महत्यांवर लिहिताना काळजाचे पाणी-पाणी होते. आकडेवारी वाचली तर मळमळ होते. कधी प्रचंड निराशा येते, कधी प्रचंड संताप येतो. सरकार तर सरकार असते. ते सरकारी कामे करतात.
का शेतकरी इतक्या मोठया प्रमाणात स्वतःला संपवतात? यातले आर्थिक, सामाजिक, मानसशास्त्रीय अर्थ काय? माझ्या मते गावातील शेतकऱ्यांची विभागणी झाली आहे.
१. मोठा शेतकरी किंवा बागायतदार
२. शेती कमी पण घरातील कोणी ना कोणी नोकरी- व्यवसायात, ही व्यक्ती शेतीला थोडीफार आर्थिक मदत करतो.
३.असे अल्पभूधारक जे पूर्णपणे शेतीच्या या तुकड्यावरच जगतात.
४.शेतमजूर.
५. वरीलपैकी कोणत्याही प्रकारातील पण व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेलेला छोटा गट.
अल्पभूधारक, शेतमजूर आणि व्यसनात अडकलेले हमखास कर्जबाजारी होतात. माणसाच्या मेंदूची कार्यपद्धती अशी आहे की, आधी मनात भावना तयार होतात, भावनांचे रूपांतर विचारात होते आणि विचारातूनच व्यक्तीचे वर्तन होते. जेंव्हा पन्नास- शंभर रुपयासाठी माणूस अडून पडतो तेंव्हा नाना पाटेकरचे डायलॉग कामी येत नाहीत, तिथे सरकारी समुपदेशन म्हणजे क्रूर थट्टाच होते. मला तर असेही वाटून जाते की, विविध पक्ष, संघटना, नेते, अधिकारी, कार्यकर्ते, सेलिब्रिटी शब्दच्छल करतात ते ऐकूनही काही जण या कोरडया सहानुभूतीने संतप्त होऊन आत्महत्या करीत असतील.
ताज्या अभ्यासानुसार माणसाच्या सात मूळ भावना असतात. आनंद,राग,दुःख,भीती,प्रेम,न आवडणे आणि आवडणे.बदललेल्या सामाजिक रचनेत पैसा हा तुमची प्रतिष्ठा ठरवतो.जेंव्हा पैसा हाती नाही तेंव्हा व्यक्तीचे रूपांतर भिकाऱ्यात होते. तो मिळेल तिथून पैसे उसने घेते, प्रसंगी खोटे बोलून कर्ज घेतो. आधीचे कर्ज फेडण्यासाठी, जगण्यासाठी आणखी कर्ज घेतो. मग एक वेळ अशी येते की,कर्ज देणारे त्याचे जगणे हराम करतात. आता खायलाप्यायला, हात खर्चाला पैसा नाही. कालचा कर्तबगार आज धरणीवर ओझे होतो. राग, दुःख, भीती आणि परत उभे राहता येणार नाही यातून तीव्र निराशा घर करतो. माणूस म्हणून अस्तित्व हरवते. हरलेला, पराभूत आपला भाऊ एक दिवस आत्महत्या करतो. आपल्या आत्महत्येनंतर आपल्या प्रियजनाना लाखभर रुपये मिळतील या समाधानातही तो शहीद होतो. माणसाच्या मनाशी बोला नाहीतर मेल्यानंतरही सरकारी पैसे मिळणार नाहीत याची खात्री झाली तर मरणावर उदार होणारा काहीही करू शकतो. मला तर भीती वाटते की, उद्या प्रत्येक आत्महत्येआधी एक तरी सरकारी अधिकारी, बँकवाला, किंवा नेत्याची हत्या होऊ शकते. सहनशीलतेचा अंत पहिला जातोय. आज दुःखाचे रूपांतर आत्महत्त्येत होत आहे. दुःखाचे रूपांतर शक्तीत झाले तर यादवी माजेल. एखाद्या छोट्या ठिणगीतूनच वणवा पेटतो. गरिबीत अडकलेल्या या भावांकडे तातडीने लक्ष द्या. उन्हाळा झालाय. तुमचे आवाज कर्कश झालेत. प्लीज, भाषणबाजी, घोषणाबाजी थांबवा.