मृृग नक्षत्र पुर्णत: कोरडा गेला. त्यानंतर मृग व आद्राच्या जोडावर बुलडाणा जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला तुरळक ठिकाणी झालेल्या पावासने शेतकरी सुखावले. परंतू २५ ते २९ जूनच्या दरम्यान, जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातून उगम असलेल्या पैनगंगा नदीला चार वेळा पूरही आला. अतिपावसामुळे नदी पात्राच्या काठावरील अनेक ठिकाणच्या शेतजमीनी खरडून गेल्या. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीचे कामे करून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेती सज्ज केली होती आणि त्यात आता शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत.
अतिपावसाने जिल्ह्यात काही ठिकाणच्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना तर खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतात मातीच उरली नसल्याने शेतीसोबत हिरवे स्वप्नही खरडल्याचे चित्र दिसत आहे. खरडून गेलेल्या जमीनीच्या नुकसानाचा सर्वे करण्याच्या सुचना सर्व तहसील कार्यालयांना आपत्ती विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
कोलवड, तांदुळवाडी, हतेडी, अंभोडा, झरी, दहिद बु., दहिद खु., देऊळघाट, दत्तपुर, उमाळा, पळसखेड, इस्लामपूर, गोंधनखेड, गिरडा, मढ व इतर पैनगंगा नदीच्या काठावरील आणि पैनगंगेला लागून असलेल्या अनेक नाल्याना आलेल्या पुराने हजारो हेक्टरवरील सुपीक जमीन खरडुन गेली. या संकटाने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसामुळे खूप मोठे नुकसान झालेले आहे.
आपत्ती विभागाने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांना पत्र पाठवून पावसाने जमीनी खरडून गेल्याने झालेल्या नुकसानाचा अहवाल तातडीने पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार सध्या खरडलेल्या जमीनीचे सर्वेक्षण कृषी सहाय्यक व तलाठी यांच्यामार्फत महसूल मंडळकाडून सुरू झाले आहेत.या पावसाचा जवळपास ७० गावांना फटका बसल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुढील दोन-तीन दिवस मुंबईला पावसाचा धोका, नागरिकांनी सतर्क रहावं – मुख्यमंत्री
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटी रुपये मंजूर