शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटी रुपये मंजूर

राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप करण्यासाठी केंद्राने यंदा २९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृषीसंबंधित कोणत्याही योजनेच्या अनुदानासाठी एरवी सतत प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबकबाबत मात्र दिलासा मिळतो आहे. ‘ठिबकसाठी भरपूर अनुदान आणि अर्ज कमी,’ अशी स्थिती तयार झालेली आहे.

“राज्य शासनाने यंदा तयार केलेल्या ठिबक आराखड्यात केंद्राकडे ४८० कोटी रुपयांची मागणी केली आहे. अर्थात ही मागणी केंद्राकडे पोचण्यापूर्वीच २९० कोटींचा पहिला हप्ता केंद्राने मंजूर केला आहे. त्यामुळे निधीची अजिबात टंचाई नाही,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठिबक अनुदानासाठी केंद्राकडून ६० टक्के; तर राज्य शासनाच्या तिजोरीतून ४० टक्के निधी दिला जातो. यंदा राज्याचा १९३ कोटींचा हिस्सा विचारात घेता शेतकऱ्यांना वाटण्यासाठी एकूण ४८३ कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नव्याने मागविल्या जाणाऱ्या सर्व पात्र अर्जांना अनुदान मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.

शेतकरी आपला अर्ज भरण्यासाठी http://mahaethibak.gov.in/preinstall/frm_ben_uid_add.php या संकेतस्थळाची मदत घेत आहेत. अर्ज करण्याची सुविधा यंदा एक जूनपासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २५ हजार अर्ज अपलोड झालेले आहेत.

शेतकऱ्याने केलेला ऑनलाइन अर्ज पुढे तालुका कृषी अधिकाऱ्याकडे पूर्वसंमतीसाठी जाणार आहेत. पूर्वसंमती मिळताच ३० दिवसांत कोणत्याही कंपनीकडून ठिबक संच बसविण्याची संधी शेतकऱ्याला मिळते. अर्थात, संच बसविल्याची पावती व अनुदान मागणीचा प्रस्ताव शेतकऱ्याला पुन्हा ३० दिवसांच्या आतच ऑनलाइन सादर करावा लागतो. तसे न केल्यास पूर्वसंमती पत्र आपोआप रद्द होते.

रासायनिक खतांच्या किमती भडकल्या

शेतकऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी दरमहा शंभर रूपये भरावे लागणार