गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांवर त्याचा परिणाम झाला असून कडधान्याची आवक घटल्याने त्यांचेही भाव वाढत गेले. त्यात यंदाही जून महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला असला तरी पाऊस नसल्याने व उन्हाच्या झळा कायम असल्याने भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होत आहे. भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून त्यांचे भाव वाढत आहे. पालेभाज्यांचे भाव सर्वाधिक वाढत असून मेथीची जुडी २५ रुपयांवर पोहचली आहे. तर वांग्याचे भाव जवळपास तीनपटीने वाढले असून कारले, गिलके, लिंबूदेखील ‘भाव’ खात आहेत. दुसरीकडे टमाट्याचे भाव मात्र कमी झाले आहेत.
मेथीची भाजी ७० ते ८० रुपयांवर
गेल्या आठवड्यात ४००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या मेथीचे भाव या आठवड्यात ४ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहेत. किरकोळ बाजारात तर मेथी ७० ते ८० रुपये प्रती किलोने विक्री होत असून जुडीचे भाव २५ रुपयांवर पोहचले आहेत. या सोबतच पोकळ्याचे भाव दीडपटीने वाढले असून बाजात समितीमध्ये गेल्या आठवड्यात १२०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या पोकळ्याचे भाव या आठवड्यात १८०० रुपयांवर पोहचले आहेत. किरकोळ बाजारात पोकळा ४० ते ४५ रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. या शिवाय पालकचेही भाव दीडपटीच्यावर वाढले असून १५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या पालकचे भाव या आठवड्यात २५०० रुपयांवर गेले.
वांगे तीन पटीने महागले
या आठवड्यात तर वांगे तीन पटीने महागले आहेत. गेल्या आठवड्यात बाजार समितीमध्ये ५०० ते १००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या वांग्याचे भाव या आठवड्यात १५०० ते ३००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. किरकोळ बाजारात वांगे ५० ते ७० रुपये प्रती किलोवर पोहचले आहेत.
कारल्यासोबत गवारही झाली ‘कडू’
- कारले १००० ते ३००० रुपये प्रती क्विंटलवरून १५०० ते ३५०० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले. अशाच प्रकारे बाजार समितीमध्ये भेंडी १४०० ते ३२०० रुपये प्रती क्विंटलवरून १७०० ते ३८०० रुपये प्रती क्विंटल, फूलकोबी – १००० ते २००० रुपये प्रती क्विंटलवरून १३०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल, गवार – ३००० रुपये प्रती क्विंटलवरून ४००० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ४०० ते १००० रुपये प्रती क्विंटलवरून ८०० ते १२०० रुपये प्रती क्विंटल, गिलके १५०० ते ३००० रुपये प्रती क्विंटलवरून २००० ते ३५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.
- टमाट्याचे होलसेल भाव मात्र १५०० ते ३००० रुपये प्रती क्विंटलवरून १५०० ते २५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत तर हिरवी मिरची २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे.
- दैनंदिन वापरात येणारी कोथिंबीरही महागली आहे. गेल्या आठवड्यात बाजार समितीमध्ये २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटलने खरेदी झालेली कोथिंबीर या आठवड्यात थेट २५०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.
- कोथिंबीरच्या दर्जानुसार किरकोळ बाजारात हे भाव ८० ते ९० रुपये प्रती किलोवर पोहचले आहेत.