परतीच्या तसेच अवेळी झालेल्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला असून तिरू हा एकमेव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. लातूर जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्पांत सध्या केवळ 29 टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. तर जिल्ह्यातील 132 लघुप्रकल्पांत केवळ 46.81 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामीण भागाला टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्ह्यात सुरवातीपासून पावसाने पाठ फिरवली होती. पावसाळा संपत आला तरी जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झाला नाही; पण परतीच्या पावसामुळे मात्र लातूरकरांना दिलासा दिला. ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात चांगला पाऊस झाला; तसेच पावसाळा संपल्यानंतर झालेल्या अवेळी पावसानेही जिल्ह्यात हजेरी लावली. ही पावसाची हजेरी देखील दमदार राहिली. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पाणीसाठ्यांत वाढ होण्यास मदत झाली आहे.
जिल्ह्याच्या दृष्टीने आठ मध्यम प्रकल्प महत्त्वाचे आहेत. या आठ मध्यम प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा 122 दशलक्ष घनमीटर इतका आहे. सध्या या आठ मध्यम प्रकल्पांत 35.620 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी 29.16 इतकी झाली आहे. यात फक्त तिरू हा मध्यम प्रकल्पच शंभर टक्के भरला आहे. तर तावरजा आणि मसलगा या दोन मध्यम प्रकल्पांत मात्र शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
जिल्ह्यात 132 लघुप्रकल्प असून त्याचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 304 दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या सर्व लघुप्रकल्पांत 142 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी 46.81 इतकी आहे. ग्रामीण भागाच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. त्यात अत्यल्प पाणीसाठा असल्याने भविष्यात ग्रामीण भागाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर ७०.८४ टक्क्यांवर
जैविक शेती उत्पादनाचे प्रमाणीकरण कृषी विभाग करणार – डॉ.अनिल बोंडे
पिक नुकसानीचे पंचनामे करा ; शेतकऱ्यांचे एक तास रास्तारोको आंदोलन