यवतमाळ – दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी सिंचनाचा आधार घेत आहेत. सिंचन करता यावे म्हणून शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर सिंचन विहिरींवर असून धडक सिंचन योजनेच्या विहिरीसोबत शेतकऱ्यांनी स्वत: कर्ज काढून विहिरीचे काम पूर्ण केले. एवढे केल्यावर आपल्याला सिंचन करता येईल असा विश्वास शेतकऱ्यांना होता पण तसे नसून सिंचन विहिरी पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना वीज जोडण्या मिळाल्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर असणाऱ्या खूप साऱ्या अडचणीत भर पडली आहे.
वीज वितरण कंपनीने वीज जोडणी करण्यासाठी कृषीपंपाला एचव्हीडीएस योजनेशी जोडले आहे. या योजनेत प्रत्येक जोडणीला एक स्वतंत्र डीपी मागण्यात आली असली तरीही प्रत्यक्षात डीपीची कमतरता आहे. या सर्व अडचणींन मुळे कृषीपंपाच्या पाच हजार जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत.
वीज वितरण कंपनीने मार्च २०१८ पर्यंतच वीज जोडणीचे अर्ज स्वीकारले आहेत. यानंतर दिले जाणारे सर्व अर्ज ऑनलाईन यंत्रणेवर स्वीकारलेच जात नाही. सन २०१६ ते २०१८ पर्यंतचे वीज जोडणीचे सहा हजार ८८७ अर्ज वीज वितरण कंपनीकडे आले आहे. या शेतकऱ्यांना एचव्हीडीएस योजनेतून जोडण्या दिल्या जाणार होत्या त्यासाठी वीज वितरण कंपनीने योजनाही जाहीर केली. या योजनेमध्ये वीज जोडणी करताना एक शेतकरी एक डीपी असा नियम जाहीर करण्यात आला. जितके अर्ज आहेत तितक्याच डीपी शेतकऱ्यांना लागणार होत्या. त्याचे कंत्राट त्रयस्त संस्थेकडे देण्यात आले. प्रत्यक्षात या डीपी अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाही.
दुष्काळी स्थितीत पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी अशा कृषीपंपाच्या वीज जोडण्या तत्काळ सुरू करण्यात याव्या या मागणीसाठी वीज कंपनीकडे येरझारा सुरू केल्या आहेत. मात्र डीपीच उपलब्ध नसल्याने वीज जोडण्या आता थांबल्या आहेत. संकटाच्या काळातही महावितरणची यंत्रणा शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणण्याचे काम करीत आहे.
वीज जोडणी करण्याचे काम कंपनीने युध्दपातळीवर सुरू केले आहे. वीज जोडणीसाठी लागणाऱ्या डीपी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहेत. त्यानुसार जोडणीचे काम करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे माळीवाडा सज्जाचे तलाठी व्ही पी नागरगोजे झाले निलंबित
नव कल्पनांनी युक्त बाजारपेठेचा विकास करण्यासाठी उद्योजकांनी एकत्र यावे – देवेंद्र फडणवीस