शेतमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव मिळण्यासाठी शासनाने सुरू केलेले ‘विकेल ते पिकेल’ अभियान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते आहे. जिल्ह्यात या अभियानाने 1 हजार 245 ठिकाणी शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्रीव्यवस्था उभी केली आहे. शेतकऱ्यांना या विक्री व्यवस्थेने चांगलाचा आत्मविश्वास दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या हस्ते 10 सप्टेंबर 2020 रोजी या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ झाला. शेतमाल विकण्यासाठी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, जागतिक बाजारपेठेत मागणी असलेल्या व ज्यापासून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल अशी पीकपद्धती व शेतीपद्धतीची पूर्नमांडणी करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान सुरु करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था उभी केली आहे. आज अखेर 1 हजार 352 ठिकाणे निश्चित करुन 1 हजार 245 ठिकाणी प्रत्यक्ष विक्री सुरु आहे.
शेतमाल विक्रीची सुविधा झाल्याने शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या उत्पादनाला चांगला दर मिळण्यासोबतच ग्राहकांनादेखील चांगल्या प्रतीची उत्पादने मिळत आहेत. या व्यवस्थेने शेतकरी व ग्राहक दोघांनाही फायदा झाला आहे. शिवाय शेतकऱ्यांना बाजारात मागणी असलेली उत्पादने शेतात पिकविण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. या अभियानामुळे ताज्या भाजीपाल्यासह धान्य व कडधान्ये ग्राहकाला आपल्या परिसरात उपलब्ध आहेत.
पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकरी तसेच शेतकरी गट यांना किमान 100 ठिकाणी शेतमाल विक्री व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण 250 शेतकरी गट , शेतकरी उत्पादक कंपनी यांना ठोक खरेदीदार, प्रक्रियादार तसेच निर्यातदारांना शेतमाल मूल्यसाखळी अंतर्गत जोडण्यात येत आहे.
शेतमाल विक्रीसाठी ब्रॅण्ड
जिल्ह्यात उत्पादीत पिकासाठी एकूण 52 मूल्यसाखळी विकास प्रकल्प राबविण्यात येत असून शेतमाल विक्रीसाठी नाममुद्रा (ब्रॅण्ड) विकसीत करण्यात येत आहेत. भात पट्ट्यातील भात उत्पादक शेतकरी थेट विक्रीसाठी सरसावले आहेत. वेल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तांदळाची ‘राजतोरण’ हा ब्रॅण्ड बनवला आहे. चालू वर्षी कोरोनाकाळात तब्बल 22 टनाहून अधिक तांदळाची विक्री केली आहे. त्यामाध्यमातून या ब्रॅण्डचा डंका गावागावांत पोहचला आहे. याशिवाच वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोरोना कालावधीत ‘राजगड’ या ब्रॅण्डच्या 35 ते 40 टन तांदळाची थेट विक्री केली असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुळशी तालुक्यातील ‘महासत्व’ ब्रॅण्ड विकसीत केला असून त्यामध्ये शेतकरी ते ग्राहक तांदूळ व नाचणी थेट विक्री कोराना कालावधीमध्ये करण्यात आली आहे.
ब्रॅण्डींगमुळे चांगला दर
‘राजतोरण’ ब्रॅण्डच्या विक्रीच्यादृष्टीने शेतकऱ्यांना पाच किलो, दहा किलो व 25 किलो तांदळाची पॅंकिग करण्यासाठी पिशव्या, वजन काटा व शिलाई मशीन आदी साहित्य देण्यात आले. याठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला दर मिळून नवीन ग्राहक तयार झाला आहे. या ब्रॅडमुळे शेतकऱ्यांच्या तांदळाला 60 ते 65 रूपयांचा दर मिळाला असून किलोमागे 10 ते 15 रूपयांची वाढ झाली आहे.
शेतमाल विक्रीसाठी संस्थाची जोडणी
प्रकल्पातंर्गत उच्च मूल्य आधारीत पिकाची लागवड तसेच त्यांना भौगोलिक मानांकन (जिओग्राफिकल इंडिकेशन- जीआय) प्राप्त करुन वाजवी दर मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अभियानांतर्गत सहकार, पणन आदी विभाग तसेच नाबार्डच्या योजनांची सांगड घालण्यात येवून शेतकरी गटांना त्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उत्पादीत शेतमालाच्या विक्रीसाठी प्रक्रियादार, निर्यातदार, सहकारी भांडार, गृहनिर्माण संस्था यांना जोडण्यात येत आहे.
थेट विक्रीसाठी आठवडी बाजार
पुणे महानगरपालिका हद्दीतील 23 जागाची यादी उपलब्ध करून दिली. महाॲग्री एफ.पी.ओ फेडरेशन यांनी महानगरपालिका क्षेत्रातील 6 जागांची आठवडी बाजार सुरू करण्यासाठी निवड केलेली असून 41 शेतकरी उत्पादक कंपनी त्यासाठी इच्छुक आहेत. श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी 4 जागासाठी 360 शेतकरी गट व 18 शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत आठवडी बाजार सुरू करण्यास इच्छूक आहे. आजरा घनसाळ शेतकरी उत्पादक कंपनी 4 जागी 37 शेतकरी गटामार्फतआठवडी बाजार सुरू करण्यास इच्छूक आहे. महानगरपालिका क्षेत्रात 12 ठिकाणी बाजार सुरू करण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
‘कॉपशॉप’ विक्री साखळी विकसित
सहकार, पणन महानगरपालिका इत्यादी विभागाच्या योजनांची सांगड घालण्यात येवून शेतकरी गटांना त्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. त्याअंतर्गत सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने कॉपशॉप विक्री साखळी विकसित करण्यात आली आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीव्यवस्था या माध्ययातून मजबूत होण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांना शहरे, आसपासचा परिसर, अन्नप्रक्रिया उद्योग, निर्यातदार यांची नेमकी मागणी याचा अभ्यास होणार असल्याने ते आत्मविश्वासाने आवश्यक तीच पिके घेऊन आपली आणि कुटुंबाची प्रगती करणार आहेत. हे पाहता ‘विकेल ते पिकेल’ अभियान शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे, त्यांना बाजारपेठेचा, विक्री व्यवस्थेचा अनुभव मिळण्याचे महत्वाचे साधन ठरणार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाने लावली हजेरी
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता
- मोठी बातमी – एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ
- सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय ! जाणून घ्या
- दररोजच्या जेवणात पनीरचा समावेश करत असाल तर मग जाणून घ्या ‘हे’ फायदे
- ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात पुन्हा निर्बंध