आजचा ‘महाराष्ट्र बंद’ हा शेतकऱ्यांसाठीच आहे – छगन भुजबळ

नाशिक – उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून आठ बसची तोडफोड झाली आहे. ठाण्यात बस बंद आहेत. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत.  महाविकास आघाडीतील नेते हे रस्त्यावर उतरून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आणि व्यापारी वर्गाला आवाहन करत आहेत.  दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने बंदला प्रतिसाद मिळत असून याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की,’मंत्री आणि मंत्रिपुत्र जे आहेत, ते आव्हान देतात काय? आंदोलन करणाऱ्या लोकांच्या अंगावर गाड्या घालतात काय? ह्यात फार मोठा फरक आहे. हा संप शेतकऱ्यांसाठीच आहे. देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही समान समजतो. ते शेतकरी ज्यासाठी आंदोलन करतायत त्यात आपल्याकडच्या शेतकऱ्यांचाही फायदाच आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे शेतकऱ्यांना चिरडून मारु शकत नाही. हा एक संदेश आपल्याला यातून द्यायचा आहे.’

दरम्यान, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार समितीमधील व्यवहार राहणार बंद राहणार असून शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणू नये असे बाजार समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. बाजार समिती बंद राहणार असल्याने लाखो रुपयांचा व्यवहार ठप्प आहे.

महत्वाच्या बातम्या –