उडीद हे ७०-७५ दिवसात येणारे पिक आहे. मुख्य पिक म्हणूनच नाही तर आंतरपीक म्हणूनही याची लागवड उपयोगी ठरते. उडीदाला मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. क्षारपड, चोपण आणि अत्यंत हलकी जमीन लागवडीसाठी टाळावी.
खरीप हंगामामध्ये कडधान्य पिकात तुरीच्या पाठोपाठ मूग व उडीद ही महत्त्वाची पिके महाराष्ट्रात घेतली जातात.
मार्च-एप्रिलमध्ये जमीन नांगरून चांगली तापू दिल्यास आधीचे किडरोग नाश पावतात. कुळावच्या पाळ्या मारुन सपाट करून घ्यावी. धसकटे वेचून जमीन स्वच्छ करून घ्यावी. हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकल्यास उत्पादनात वाढ होईल. उडीदाची पेरणी जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यादरम्यान केल्यास सरासरी सर्वाधिक उत्पादन मिळते.
पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट येत असल्याचे शेतकरी व तज्ञांचे म्हणणे आहे. ४५ X १० सेमी या अंतरावर पेरणी करावी. हेक्टरी १०-१५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी एक किलो बियाण्यास बाविस्टीन १ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम चोळा. ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते. जिवाणु संवर्धक रायझोबियम व पीएसबी प्रति २५० ग्रॅम १० किलो बियाण्यास लावून पेरणी करावी.
उडीद पिकाच्या सुधारित जाती
जमिनीची मशागत करताना जमिनीत शेणखत व्यवस्थित पसरवून घ्यावे. तसेच पेरणीच्या वेळी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद प्रतिहेक्टरी द्यावे. पेरणी झाल्यानंतर एक महिन्यात तण नियंत्रणासाठी एक खुरपणी व दोन कोळपण्या करून घ्याव्यात.
यावर भूरी रोगाचा प्रादुर्भाव फुलांच्या पुर्वी अथवा पीक फुलोऱ्यात असताना होतो. याच्या नियंत्रणासाठी सल्फेक्स ०.३० टक्के किंवा पाण्यात विरघळणारे गंधक २०-२२ ग्रॅम / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गंधकाची भुकटी २० किलो हेक्टरी धुरळणी केल्यानेही नियंत्रण होते. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी क्वीनॉलफॉस ३५ ईसी ०.०७ टक्के २० मिली याप्रमाणे १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
उडीदाच्या बहुतांश शेंगा पक्व झाल्यास पावसाचा अंदाज घेऊन काढणी उरकावी. तोडणी केलेल्या शेंगा उन्हात वाळवून काठीने बडवून किंवा ट्रॅक्टरने मळणी करुन खेळत्या हवेच्या वातावरणात साठवाव्यात.