कोथिंबीर , पालेभाज्यांच्या दारात वाढ

पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाने दमदारपणे हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत आहे. नाशिक जिल्ह्यात कोथिंबीरचे  उत्पादन चांगल्या प्रमाणातअसून, दैनंदिन बाजार समितीत कोथिंबीर विक्रीसाठी दाखल होत आहे. गुजरात राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीर मालाची मागणी वाढली आहे. गुजरात राज्यासह मुंबई, पुणे बाजार समितीत कोथिंबीर मालाची मागणी वाढल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरचे बाजारभाव वाढले आहे.

सोमवारी सायंकाळी झालेल्या लिलाव मध्ये कोथिंबीर ९० रुपये प्रति जुडी असा बाजारभाव मिळाला. कोथिंबीर पाठोपाठ मेथी ६० रुपये तर कांदापात ३६ व शेपू ३५ रुपये प्रति जुडी या दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.

त्यातच परजिल्ह्यातील बाजारपेठेत कोथिंबीर कमी पडल्याने नाशिकमधून मोठ्या प्रमाणात कोथिंबीर मालाची निर्यात केली जात आहे. मुंबईसह पुणे जिल्ह्यातही नाशिक बाजार समितीतून कोथिंबीर निर्यात केली जात आहे. त्यामुळे परबाजारपेठेत मागणी वाढल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत, असे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.

चालू वर्षी कोथिंबीर बाजारभावाने ९० रुपये बाजारभाव गाठला असला तरी आगामी कालावधीत उत्पादन घटले तर बाजारभाव तेजीत येण्याची शक्यता असल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.