हरभरा पिकात घाटेअळी, तंबाखू अळी, कटवर्म व उंदीर यांचा त्रास होतो. घाटेअळी ने होणारे नुकसान खूप मोठे असते. आपल्या कडील बहुतेक पिकात अशाच किडींचा कमी जास्त प्रभाव असतो. गेल्या अनेक वर्षात अनेक प्रकारचे रासायनिक कीटकनाशक वापरून या किडींचा नाश आपण करू शकलेलो नाही. त्यामुळे कुठलेही एक औषध हे काम करू शकेल असे वाटत नाही.
या किडींचा समूळ नाश करण्या ऐवजी यांची संख्या नियंत्रणात राहील असा प्रयत्न आपण करू शकतो. यासाठी सर्व प्रथम परिसर स्वच्छ ठेवावा. काडीकचरा व तण मुक्त असावा. मातीत देखील किडी वाढू नये म्हणून योग्य ती मशागत केलेली असावी. वर्षभरातून एकदा जमिनीत चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतासोबत ट्रायकोडर्मा व मेटारायझीअम सारखी जीवाणू औषधे (एकरी १ ते ३ किलो) नीट मिसळलेली असावीत.
कीड नियंत्रणासाठी सर्वप्रथम नैसर्गिक प्रक्रियांचा उपयोग करणे आवश्यक आहे. मित्रकिडीचा वावर आपल्या शेतात आहे कि नाही याचा अभ्यास करायला हवा. कोळसा, साळुंख्या व चिमण्या मोठ्या प्रमाणत किडीचा फज्जा उडवतात. त्यांच्यासाठी थांबे बनवावे.
पिवळे व निळे चिकट सापळे ७:३ प्रमाणत वापरल्याने त्यावर किडी चिकटतात. त्यावर बघून आपण कोणती कीड किती प्रमाणात आहे याचा अंदाज लावू शकतो. एकरी २० ते २५ सापळे (६ इंच X ८ इंच) लावले तर किडींचा प्रजननाचा वेग मंदावून कीड नियंत्रित रहाते.
हरभरा पिकात घाटेअळी चे नियंत्रण सर्वात महत्वाचे आहे त्यासाठी सुरवातीलाच कामगंध सापळे लावले तर तिच्या संख्येवर लक्ष ठेवून चांगले नियंत्रण शक्य आहे.