मित्रहो, जुलैच्या पहिल्या आठवडयात, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भेंडी लागवड केली जाते. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून त्यात कमीत कमी एकरी२ ते ३ टन शेणखत मिसळावे. शेणखत मिसळतेवेळी त्याच्या माध्यमातून जैविक बुरशी नाशक व जैविक कीडनाशक तसेच सूक्ष्मअन्नद्रव्य (फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, डायसोडीयम बोरेट) व भूसुधारक द्यायला हवेत. त्यांचे प्रमाण आपल्या अनुभवानुसार किंवा अभ्यासानुसार कमी जास्त करावेत. मृदा चाचणी केली असल्यास त्याचा विचार घ्यावा.
बियाणे निवडते वेळी चागल्या कंपनीचे बियाणे खात्रीशीर ठिकाणाहून घ्यावे. ४० ते ४५ दिवसात तोडणी सुरु होणारे व वायव्हीएमव्ही (यलो व्हेन मोझॅक व्हायरस) तसेच ओएलसीव्ही (ओक्रा लीफ कर्ल व्हायरस) या विषाणूला बळी न पडणारे बियाणे निवडावे. भेंडीची लांबी साधारण १० ते १२ सेमी इतकी असावी व तोडायला सोपी असावी. लागवड दोन फुटावर सरी पाडून, सरीच्या दोघी बाजूस १ फुट x अर्धा फुटावर केल्यास एकरी ६ ते ७ किलो बियाणे लागते. चांगल्या कंपनीचे बियाणे घेतल्यास त्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेलीच असते, नसल्यास थायरम अथवा कार्बेन्डॅझिम ३ ग्राम प्रती किलो दराने प्रक्रिया करावी. थोडे सुकवून लगेच टोकून लागवड करावी. पावसाळ्या व्यतिरिक्त वेळेस भेंडी साठी ठिबक व चंदेरी पेपर मल्च चा उपयोग करणे फायदेशीर ठरते. बी टोकन यंत्राचा वापर केल्यास वेळ व मजुरीचा खर्च वाचतो.
लागवडीपूर्वी ४५ किलो युरिया, १३० किलो सिंगल सुपर फाँस्पेट व ३४ किलो एम ओ पी द्यावे. लागवडी नंतर ३० दिवसांनी ४५ किलो युरिया परत द्यावा. मात्र माती परीक्षण केलेले असल्यास त्या नुसार खताचे डोस नियंत्रित करावेत.
एन पी के १९-१९-१९ व ००-५२-३४ या विद्राव्य खतांची आलटून-पालटून फवारणी, कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर ची आळवणी करावी व लोह-मंगल-जस्त-तांबे-मोलाब्द व बोरॉन युक्त मिश्र मायक्रोन्यूट्रिअंट खताची फवारणी केल्याने पिकाचे संतुलित पोषण होऊन रोग-किडींचा त्रास कमी होतो, पिक लवकर तोडणीवर येते.
या फवारण्या माफक खर्चात होतात व पिकाच्या वाढीत येणाऱ्या अडचणी जसे “अन्नद्रव्याची कमतरता, अपटेक न होणे, ढगाळ वातावरण व रससोशक किडीमुळे कमी झालेले प्रकाससंश्लेषण” यावर मात करण्यास पिकास मदत करतात.