आवळ्याचे विविध पौष्टीक पदार्थ

आवळा..बाजारात सहज उपलब्ध होणारे फळ आहे. आवळ्याला फक्त फळ म्हणून न पाहता त्याकडे औषध म्हणून पाहण्याची गरज आहे. कारण आवळ्यामध्ये असणारे गुणधर्म तुम्हाला अनेक आजारापासून दूर ठेवतात. छोट्याशा आकाराच्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन एबी कॉम्पेक्स, पोटेशियम, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशियम, कारबोहाइड्रेट फायबर यासारखे अनेक सत्व असतात. आवळ्यापासून लोणचे, मुरंबा, ज्यूस, सुपारी, चूर्ण असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्याचे मूल्यवर्धन करता येते.

१. आवळ्याचे लोणचे

 • अर्धा किलो आवळे मंद आचेवर वाफवून घ्यावेत आणि बिया वेगळ्या कराव्यात.
 • कढईत तेल घालून त्यात लाल मिरच्या लालसर रंग होईपर्यंत तळाव्यात.
 • तेलामध्ये १ मोठा चमचा मोहरी व प्रत्येकी १ चमचा जीरे, बडीशेप, १/४ चमचा ओवा, १ चिमूट हिंग, अर्धा चमचा हळद व गरम मसाला तळून घ्यावा.
 • तेलातील मिश्रणात आवळे सोडावे व चवीनुसार मीठ घालून मिसळावे.
 • सर्व मिश्रण गार होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यात लाल तिखट घालून ढवळावे आणि बरणीत भरावे.

२. आवळा कँडी

 • आवळे बारीक चिरावेत व त्यातील बिया काढून टाकाव्यात.
 • साखरेचा पाक करून तो गार झाल्यावर त्यात आवळ्याचे तुकडे घालावेत.
 • एक दिवस हे मिश्रण तसेच झाकून ठेवावे.
 • दुसऱ्या दिवशी ज्यास्तीचा पाक गाळावा आणि त्यात साखर घालावी.
 • हे मिश्रण पुन्हा एकदा उकळावे. त्यात आवळ्याचे तुकडे घालून मिश्रण पुन्हा एक दिवस ठेवावे.
 • याच पद्धतीने मिश्रण पाच दिवस ठेवावे.
 • पाच दिवसांनंतर आवळ्याचे तुकडे बाहेर काढून उन्हात पूर्ण सुकवावे.

३. आवळा सुपारी

 • आवळे स्वच्छ धुऊन घ्यावेत, उकडून घ्यावेत आणि बिया काढून टाकाव्यात.
 • आवळ्याचे तुकडे बरणीत भरून २ चमचे सैधवमीठ, १ चमचा साधे मीठ आणि अर्धा चमचा काळी मीरपूड, प्रत्येकी अर्धा चमचा जिरे व ओवा पुड घालावी.
 • सर्व मिश्रण एकत्र मिसळावे. हे मिश्रण ३ दिवस मुरू द्यावे व दिवसातून दोन वेळा हलवावे.
 • नंतर मिश्रण ताटामधे पसरवून उन्हात वाळवावे. ३ ते ४ दिवस वाळवल्यानंतर तयार सुपारी हवाबंद डब्यात भरावी.

४. आवळ्याचे सरबत

 • ५-६ आवळे वाफवून घ्यावेत. बिया काढून गर काढावा.
 • गरामध्ये २ चमचे साखर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मीरपूड, अर्धा चमचा आल्याचा रस घालून एकत्र पल्प बनवावा आणि गाळणीने गाळून घ्यावे.
 • तयार रसामध्ये पाव चमचा लिंबाचा रस आणि पाणी मिसळून सरबत तयार होते.

अंजीर लागवड पद्धत

भात लागवड तंत्र