राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तब्बल १०० कोटींचे झाले नुकसान

औरंगाबाद – पावसाने औरंगाबाद जिल्ह्यचे मोठ्या प्रमाणावर नुकसान  झाले आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात जवळपास १०४ कोटी ९७ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर नुकसानीची माहिती पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सादर केली. यात रस्त्यांची दुरूस्ती, पुलांची कामे, इमारत दुरूस्ती, नाल्यांची दुरूस्ती या कामासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.

औरंगाबाद शहरात मागच्या महिन्यामध्ये झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. नाल्यांमधून पाणी वाहत असताना संरक्षण भिंती पडल्या, नाल्यात कचरा साचला, रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले, काही भागात रस्ते वाहूनही गेले, रस्त्याची जमीन खरवडून गेली. पुलांचे देखील नुकसान झाले. पालिकेच्या इमारती, आरोग्य केंद्र, पालिकेच्या मालकीचे सामाजिक सभागृह अशा एकूण ८६ कामांचे मोठे नुकसान झाले. पालिकेने तातडीने नुकसानीचा अहवाल अभियंत्याकडून मागवला.

अजित पवार यांनी शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील नुकसानीचा आढावा घेतला. या बैठकीत पालिका प्रशासक पांडेय यांनी शहरात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर अहवाल सादर केला. शहरात ८६ कामांसाठी १०४ कोटी ९७ लाख रूपयाच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी राज्य सरकारकडून पालिकेला मिळावा, अशी विनंती पांडेय यांनी केली. शहरातील रस्त्यांना व पुलांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. १४ पुलांच्या दुरूस्तीसाठी १०.७० कोटी आणि १८ रस्त्यांच्या कामांसाठी ६७.२३ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.

महत्वाच्या बातम्या –