मुंबई – कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम ज्ञान देश विदेशातून मिळविले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
रासायनिक शेतीचे दुष्परिणाम पाहून शेतकऱ्यांनी पुन:श्च सेंद्रिय शेतीची कास धरावी असे सांगताना कृषी विद्यापीठांनी शेतीचे आधुनिक ज्ञान व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी आपण सर्व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना सूचना करू, असे राज्यपालांनी सांगितले.
वंदे भारत विकास फाउंडेशन व ॲडराईज इंडिया यांनी शेतकऱ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्यवर्धनासाठी विकसित केलेल्या ‘वंदे किसान ॲप’चे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २) राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार आशिष शेलार, ॲडराईज इंडिया व वंदे भारत विकास फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी, व्यवस्थापकीय भागीदार अनिरुद्ध हजारे, प्रगतिशील शेतकरी पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत प्रामुख्याने उपस्थित होते.
देश अन्नधान्याच्या बाबतीत आयातदार असल्याचे आपण पहिले आहे. त्याकाळात देशात अमेरिकेकडून निकृष्ट गहू येत होता. भारताने गेल्या 40 -50 वर्षांत कृषी क्षेत्रात मोठी प्रगती केल्याने कोरोना संकट काळात अर्थव्यवस्था मजबूत राहिली. अन्नधान्याच्या बाबतीत देश आज स्वयंपूर्ण आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
आज गावागावातील शेतकऱ्यांना नवीनतम ज्ञान हवे आहे. मोबाईल ॲप व डिजिटल माध्यमातून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोबाईल कनेक्टिव्हीटी चांगली असली पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
वंदे किसान डिजिटल व्यासपीठ हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून त्यातून हे ॲप देशभर प्रचलित होईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ दिवस जोरदार पावसाची शक्यता
- शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा – दादाजी भुसे
- विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा इशारा
- भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव; नागरिकांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले ‘हे’ आवाहन
- दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राज्यात विशेष मोहीम – धनंजय मुंडे
- हळद घातलेलं दूध का प्यावे आणि काय आहेत त्याचे फायदे, घ्या जाणून …..