राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा; राज्यातील ‘या’ पंचायतीचा देशात दुसरा क्रमांक

नवी दिल्ली – केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार (National Water Award) 2020’ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला असून  महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने विविध राज्ये, संस्था आणि व्यक्तींना  11  श्रेणींमध्ये एकूण 57 पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले . यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. २०१८ पासून राष्ट्रीय जल पुरस्काराची सुरुवात झाली आहे.

दापोली नगर पंचायत आणि सुर्डी ग्रामपंचायत पुरस्कारांच्या मानकरी

सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्थेच्या श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट तीन संस्थांची निवड करण्यात आली असून यात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या श्रेणीमध्ये पश्चिम विभागातून निवड करण्यात आलेल्या तीन ग्रामपंचायतींमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी ग्रामपंचयातीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जलव्यवस्थापनात उत्कृष्ट कार्यासाठी देशातून तीन गैर शासकीय संस्थांची निवड करण्यात आली असून या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्थेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

जनतेमध्ये जलजागृतीकरिता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील एक वृत्तपत्र आणि एका वृत्तवाहिनीचीही सर्वोत्कृष्ट माध्यम श्रेणीत निवड करण्यात आली असून सकाळवृत्तपत्र समूहाच्या ‘ॲग्रोवन’ वृत्तपत्रास सर्वोत्कृष्ट वृत्तपत्राचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार स्वरूप रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येतील.

महत्वाच्या बातम्या –