लेख : जमिनीवरच्या राजना मनसे शुभेच्छा!

बदल निसर्गाचा नियम आहे. मग माणूस बदलला तर स्वागतच व्हायला हवं अर्थात बदल सकारात्मक असेल तर. इंजिनाच्या वाफेवर हवेत गेलेले राज ठाकरे कमालीचे आक्रमक वाटताहेत. आता महाराष्ट्र दौरा हाती घेतला आहे. खरंतर पक्षबांधणी करण्यासाठी झंझावाती दौरा तर २०१२ ला केला होताच मात्र मुंबई – पुण्याचा राज अन त्यांचा शहरी पक्ष ही प्रतिमा अजून तरी पुसता आली नाही. महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी शहरी पगडा असणारा अन पाकचाक असणारा नेता चक्क जमिनीवर बसून आदिवासी पाड्यात सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जेवला हे पाहून आनंद वाटला.

पाठीमागच्या ४ – ३ वर्षांपूर्वी माझ्या माहितीतल्या एका प्रचंड प्रेम असणाऱ्या राजचाहत्याने मोठा धाडसी निर्णय घेतला होता. त्यावेळेचा महाराष्ट्र दौरा करत असताना राज ठाकरे ज्या रस्त्यावरून पुढे जाणार होते त्याच रस्त्याला त्याचे गाव होते. राज ठाकरेंनी २ मिनिट गाडी थांबवावी आणि केवळ काच खाली घ्यावी एवढीच माफक अपेक्षा त्या मनसैनिकाची होती. तो मनसैनिकही अगदीच सामान्य नव्हता तर त्या गावचा सरपंच होता. मात्र राज ठाकरे २ मिनिट थांबले नाहीत म्हणून थेट पक्षांतर करून मनसेला लाथ दिली होती. अशी अनेक उदाहरणं तुमच्याही अवतीभवती असतीलच.

मागच्या नोव्हेंबर महिन्यात नाशिकला पक्षबांधणी बैठकीत राज ठाकरे पहिल्यांदा खाली बसलेले बघितले तेव्हाच आगामी काळात थोडी धडधाकट भूमिका घेतील अशी आशा निर्माण झाली होती. मात्र मध्यंतरी राष्ट्रवादीशी जवळीक केल्यावर मात्र प्रचंड वातावरण चलबिचल झालेलं. कारण आजपर्यंत खरे विरोधक म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर त्याच्याच पंगतीला बसणं हे उरल्या सुरल्या मराठी माणसांना पटणारं नाही. आता पुन्हा जुन्या बाटलीत नवी जान आणत महाराष्ट्र दौरा हाती घेतला असला तरी पक्षबांधणीसाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतील.

शहरात जन्माला येऊन शहरी बाळसं धरलेल्या पक्षाला खेड्यामातीत रुजायला जरा जड जाईल. शहरी बाणा सोडून मातीतल्या प्रश्नावर झगडावं लागेल. एव्हाना नाशिकहून मुंबईला आलेल्या किसान लॉंग मार्चला पाठींबा देऊन तशीही तयारी दर्शवली आहेच. मात्र हे सगळं घडत असताना राजकीय विरोधकांना शांत बसवताना आणि त्यांच्यावर तुटून पडताना पर्याय म्हणून काम दाखवावं लागेल. मोदी वाईट आहेत म्हणून आगपाखड करणं सोप्पं असतं मात्र मोदी नको तर त्या तोलामोलाचा सक्षम पर्याय देता यायला हवा तरच त्या टीकेला वजन येईल.

महाराष्ट्र हातात हवा तर महाराष्ट्र एकदा कडेकपारीने पारखायलाही हवा. एसीच्या बाहेरचा गारवा घ्यायला हवा, मातीत राबणाऱ्या काळवंडलेल्या माणसांच्या खांद्यावर हात टाकून हिरवं स्वप्न दाखवता यायला हवं. प्रदेश पदाधिकाऱ्यांपासून सामान्य माणसांपर्यंत एक चेन तयार झाली तर खऱ्या अर्थाने पक्ष जोमाने तग धरू लागेल. शहरात सभा घेऊन एसीच्या गाडीत फिरलात तर महाराष्ट्र काय महापालिकाही येणार नाही.

आज ज्या जोमाने कामाला लागले आहात तोच उत्साह आणि जोश शेवटपर्यंत रहावा, होत असलेल्या बदलामध्ये सातत्य राहिलं तर कदाचित 5- 10 वर्षांनी महाराष्ट्र कुणाच्या हातात असेल याची खात्री आज देता येणार नाही. मनसेची काही मते पटत नसली तरीही आज फोटो पाहून अभिमान वाटला, सत्ताधारी जितका सक्षम तेवढाच विरोधकही असायला हवा तर खऱ्या अर्थाने लोकशाही चिरतरुण राहील… होणाऱ्या बदलाला मनसे शुभेच्छा ! सत्य आणि सातत्य यशाकडे घेऊन जाईलच.

 

– @विकास विठोबा वाघमारे