बारामती- दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. अशात गर्मीपासून सुटका करण्यासाठी एसी, कुलर व पाण्याची मोटार यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या उपकरणांचा वापर करतानाच वीज बचतीच्या काही किरकोळ गोष्टी लक्षात ठेवल्यास वीज बचतीसोबत अपव्यय टळेल आणि भरमसाठ बिल आल्याचीही चिंता मिटेल.
नियोजन न केल्यास काही गोष्टींची तूट मोठ्या प्रमाणावर निर्माण होते आणि त्यामुळे विकासालाच नव्हे तर दैनंदिन व्यवहारालाही खीळ बसू शकते अशा दोन गोष्टी म्हणजे वीज व पाणी. पाण्याच्या बाबतीत पावसाच्या पाण्याचे योग्य नियोज, संचय तर वीज ही निर्माण करून तिचे वितरण करावे लागते. या दोन्हींमध्ये त्यांचा योग्य वापर होणे गरजेचे असते. अन्यथा भरमसाठ वापर केल्यास या संसाधनाची टंचाई निर्माण होते. त्यासाठी पाणी व विजेचा योग्य वापर व्हायला हवा. याची समज प्रत्येकाला येणे गरजेचे आहे.
आपला देश कितीही प्रगत असला तरी कित्येक खेडेगावांत सुखसुविधांचा अभाव आहे. त्यातलीच एक सुविधा म्हणजे वीज. आजही अनेक गावे अंधारात आहेत. शहरी भागांत राहणारी मंडळी बऱ्याचदा विजेचा अपव्यय करतात. तो कमी केला आणि वीजबचतीची सवय लावली तर अंधारात जगणाऱ्यांनाही वीज मिळेल. विज्ञानानुसार वीज निर्माण करावी लागते. वीज साठवून ठेवणारी काही उपकरणे व यंत्रणा महागड्या आहेत. विजेचं उत्पादन आणि वहन यासाठी लाखो किलोमीटरच्या वाहिन्यांचं जाळं आणि उपकेंद्रं उभारावी लागतात. ज्या धातूमधून वीज वाहून नेली जाते, त्या धातूमुळे काही प्रमाणात विजेची घट होते. याचाच अर्थ असा की विजेचे वहन करताना वीज वाया जाते. यासाठी सगळ्यांनी विजेचा योग्य वापर केला तर विजेची बचत होईल आणि ज्यांच्या घरात वीज नाही, त्यांना टी देऊन त्यांची घरे उजळतील.
यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. सर्वांनी विजेची बचत करणे आपले कर्तव्य ठरते. प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत सुसूत्रता आणल्यास विजेच्या मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकते.
आज वाढत्या शहरीकरणाच्या युगात जवळपास प्रत्येक घरात दूरचित्रवाणी संच आणि मोबाईल फोन आहेत. टीव्हीचा वापर करणाऱ्या प्रत्येकाने ती बंद करताना स्टँडबाय मोडवर ठेवून रिमोटचा वापर करण्याऐवजी भिंतीवर लावलेले बटन बंद करावे. त्याचप्रमाणे मोबाईल फोन चार्ज झाल्याबरोबर बंद करावा. आज शहरांमध्ये बहुमजली इमारतींमध्ये लिफ्टचा वापर होतो. तथापि, लिफ्टमधील पंखा गरज नसताना बंद ठेवल्यास विजेचा अपव्यय टाळता येतो. तसेच सर्वच मोठ्या शहरांमध्ये मॉल्स उभे आहेत. या मॉल्समधील रोषणाई करणारे होर्डिंग्ज अहोरात्र सुरू असताना लिफ्टचा अमर्याद वापर केला जातो. त्यालाही थोडा आळा घातल्यास हमखास वीज बचत होऊ शकते. दूरचित्रवाणी संच रिमोट कंट्रोलविना थेट बंद केले तर 8 ते 20 वॅट विजेची बचत होऊ शकते. शौचालय व स्नानगृहात सुमारे 40 वॅटचे बल्ब असतात. त्या ठिकाणी 2-2 वॅटचे बल्ब वापरले तर 76 वॅट विजेची बचत होऊ शकते. देवघर व देवांच्या तैलचित्रांसमोरचा छोटा दिवा 22 वॅटपेक्षा कमी नसतो. तेथे 2-4 वॅटचा बल्बही पुरेसा आहे. पंख्याच्या जुन्या रेग्युलेटरऐवजी इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर वापरल्यास 8 ते 15 वॅटची बचत होते. संगणक बंद करताना बटन वापरले तर 6-7 वॅट वीज वाचते. घर व इतर ठिकाणच्या स्वीच बोर्डावरील इंडिकेटर काढले तर विजेची बचत होते. फ्रिजमधील रेग्युलेटर 4 ते 5 च्या दरम्यान ठेवायला हवे. त्यामुळे एका घरासाठी 750 वॅटऐवजी 275 ते 300 वॅटमध्ये विजेची गरज भागते.
बऱ्याच शासकीय तसेच खासगी कार्यालयांमध्ये दिवे, पंखे, संगणक विनाकारण सुरू असतात. काम नसेल तेव्हा ते बंद केल्यास वीज बचत होईल. दालनामध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक हवा, वारा, उजेड येईल अशी सोय केल्यास वीजवापर आटोक्यात येईल. दिवे व ट्यूब्ज यांच्यावर धूळ साचू देऊ नये. एलईडी दिव्यांमुळे अधिक बचत होत असल्याने त्यांचाच वापर करावा. पंखे वेळोवेळी स्वच्छ करावेत. कारण धुळीमुळे त्यांची कार्यक्षमता घटते. स्नानानंतर केस सुकवण्यासाठी पंख्यांचा वापर करू नये. एअरकंडिशनरकरिता पंख्याच्या सहापट वीज लागते म्हणून शक्य असेल तर एअरकंडिशनरचा वापर टाळावा. उष्ण, कोरड्या हवामानात एअरकंडिशनरपेक्षा कुलरचा वापर उपयुक्त ठरतो. यानंतरही एअरकंडिशनर वापरत असाल तर महिन्यातून एकदा त्यातला एअर फिल्टर साफ करावा. खोलीतून बाहेर पडण्याच्या अर्धा तास आधी ए.सी. बंद करावा. त्यामुळे गारव्यात विशेष फरक पडत नाही. ए.सी.चे तापमान नेहमी 24 ते 26 अंशादरम्यान ठेवावे.
पाण्याचा पंप वापरतानाही मोठ्या प्रमाणावर वीज बचत केली जाऊ शकते. आयएसआय मार्क असलेला पंप विकत घ्यावा. सुयोग्य क्षमता व उपयुक्त प्रकारचाच पंप निवडा. पंपाला अनुरूप ठरेल अशी मोटर बसवा. मोटरला संयुक्तिक असा स्टार्टर बसवा. पीव्हीसी पाईप तसेच अल्प रोधनाचा व्हॉल्व वापरावा. पंप प्रणालीतील जलगळती टाळा. ऑटोमॅटिक वॉटर लेव्हल कंट्रोलरचा वापर करा. आयएसआय मार्कचे योग्य क्षमतेचे शन्ट कॅपॅसिटर बसवा. पंपसेट नियमित लुब्रिकेट करा. शक्यतो पंप विजेच्या उच्चतम मागणीच्या वेळी वापरणे टाळा.
प्रत्येक नागरिकाने चंगळ थांबवून विजेचा गरजेपुरताच वापर केल्यास देशात कधीही वीजटंचाई जाणवणार नाही आणि सर्वांना पुरेशी वीज मिळेल. प्रत्येक जबाबदार नागरिकाने वीज बचतीची मोहीम आपल्या घरापासून कार्यालयापर्यंत राबवायला हवी. वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे विजेची बचत म्हणजेच विजेची निर्मिती आहे. तीच काळाची गरज आहे.
– ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, बारामती परिमंडल