पुणे – कोरोना महामारीचा फटका संपूर्ण विश्वाला बसला आहे. या रोगामुळे भारताचे देखील मोठे नुकसान झाले. या नुकसानाचे पडसाद थेट जीडीपीवर देखील पाहायला मिळाले. सर्वच क्षेत्रांना यामुळे नुकसान सोसावे लागले, यात सर्वाधिक कष्टाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर देखील आणखी एका आव्हानाची भर पडली आहे.
अवकाळी पाऊस, कीड, लॉकडाऊनमुळे बंद बाजारपेठा यामुळे चारी बाजूनी संकट शेतकऱ्यांवर आले होते. मात्र, अशाच एका शेतकऱ्याने खचुन न जाता पुन्हा जिकरीने पीक घेतलं आणि कष्टाचं सोनं झालेलं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी कोथिंबीरच्या पिकातुन लाखोंचा फायदा एका शेतकऱ्याला झाल्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरले. आता, पुण्यातील एका शेतकऱ्याने झेंडूच्या फुलातून तब्बल ६२ लाखांचा नफा कमावला आहे.
काय आहे या शेतकऱ्याची कहाणी?
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वळती गावच्या एका शेतकऱ्याने फेब्रुवारी महिन्यात कलिंगड आणि खरबुजाची लागवड केली होती. पण लॉकडाऊनमुळे शेतमाल सडून गेला. यामुळे लाखोंचा फटका शेतकरी धोंडीभाऊ रामभाऊ भोर यांना बसला. पण यानंतरही भोर यांनी मोठा धोका पत्कारत झेंडुच्या फुलांची लागवड केली आणि या झेंडुच्या फुलांमुळे भोर यांना तब्बल 62 लाखांचा नफा झालेला आहे.
लॉकडाऊन काळात अजून देखील राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद आहेत त्यामुळे फुलांच्या मागणीत देखील प्रचंड घट झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या फुलांची पिके शेतातच उन्मळून टाकली. पण यादरम्यान मात्र भोर यांनी नशीब साथ देईल या आशेवर त्यांनी आपल्या शेतात झेंडुची लागवड केली.
झेंडुची लागवड करताच त्यांनी नशिबानेही साथ दिली. भोर यांच्या झेंडूला किलोला 100 रुपयांपासून 180 रूपयांपर्यंतचा उच्चांकी बाजारभाव मिळाला आणि भोर यांना आठ एकर झेंडूतून तब्बल 70 लाख रुपये मिळाले. खर्च वजा करता भोर यांना झेंडूतून 62 लाख रुपयांचा नफा झाला आहे. आपल्याला फक्त हा फायदा दिसत असला तरी प्रसंगी मजूर देखील न मिळाल्याने मुलांना सोबतीला घेऊन केलेले काबाड कष्ट, मेहनत, सतत घोंघावणाऱ्या संकटाचा सामना हे वाखाणण्याजोगे आहे.
महत्वाच्या बातम्या –