Share

30 ऑक्टोबरपर्यंत संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान जमा होणार – नितीन राऊत

नागपूर – जिल्ह्यातील निराधार व्यक्तींना दरमहा मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सप्टेंबर 2021 पर्यंतचे सर्व अनुदान 30 ऑक्टोबर पर्यंत दिवाळीच्या आत सामान्य नागरिकांच्या हाती पडेल. त्यासाठी प्रशासनाने तयारी केली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. या योजनेसंदर्भातील समितीवर नियुक्त झालेल्या सदस्यांसोबत व प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत बोलताना निराधार योजनेतील अनुदान 30 ऑक्टोबर पर्यंत बँकेत जमा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या तक्रारीसंदर्भातही चर्चा झाली. शासकीय यंत्रणेने अधिक जलद गतीने सामाजिक आर्थिक योजनांची अंमलबजावणी करावी. नागरिकांकडून आलेल्या सूचनेनंतर सेतू कार्यालयामध्ये दोन विशेष कक्ष उघडण्यात आले आहे. या दोन कक्षामध्ये प्रलंबित प्रकरणाच्या दाव्यामधील अपूर्ण व चुकीचे कागदपत्र तपासले जात आहे. नागरिकांनी या लाभासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी. अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले.

राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी संजय गांधी निराधार योजना कार्यान्वित आहे. या योजनेशी संबधित शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले सामाजिक दायित्व पूर्ण करत सामान्यातल्या सामान्य माणसाला मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या समितीवर नियुक्त झालेल्या सर्व सदस्यांकडून याबाबत येणाऱ्या सूचनाचे स्वागत करावे. त्यावर कायदेशीर कारवाई करावी, दुर्गम भागात अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करावा, असे  त्यांनी सांगितले.

समिती सदस्यांना विभागानुसार आठवड्याची दिवस ठरवून द्यावा, त्यांची बैठक व्यवस्था करावी, असाह्य नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करावी, सिकलसेलच्या रुग्णांना देखील या योजनेत न्याय मिळावा. तसेच या संदर्भातील बैठकी दरमहा घेण्यात यावी, अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केल्या.

या बैठकीला जिल्हाधिकारी विमला आर, संजय गांधी निराधार योजनेच्या समन्वयक तहसिलदार चैताली सावंत, समितीचे अध्यक्ष दीपक खोब्रागडे, जुल्फिकार अहमद भुट्टो, सागर सतीश चव्हाण, आशिष बबन कटारे, श्रावण खापेकर सावजी आदींची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या – 

मुख्य बातम्या

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon