तुम्हाला जर कंबरदुखी असेल तर माहित करून घ्या कारणे आणि उपाय

कंबरदुखी आजच्या जमान्यात फार मोठी समस्या झाली आहे. १० पैकी ७ जणांना कंबरदुखीचा त्रास असतो.बदलेली जीवनशैली व सतत एका जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे अनेकांना कंबरदुखीचे दुखणे मागे लागते.कंबरदुखीची कारणे,उपाय थोक्यात.

कंबरदुखीचे दुखणे हे हलके, मध्यम वा तीव्र अशा स्वरुपाचे असू शकते, जे सतत आवळल्याप्रमाणे, घट्ट धरुन ठेवल्यासारखे, खेचल्याप्रमाणे वा ताणल्याप्रमाणे किंवा भोसकल्याप्रमाणे अशा वेगवेगळ्या स्वरुपाचे असू शकते.वेदना सुद्धा एकाच जागी होणारी, एकाच जागी सुरु होऊन त्या जागेच्या सभोवताली पसरणारी, एका जागेवरुन सुरु होऊन संबंधित नसेच्या मार्गामध्ये पसरणारी, जसे कंबरेपासुन सुरु होऊन गुडघ्यापर्यंत जाणारी अशी असू शकते.

जेव्हा कंबरेचे स्नायू ,नसा, सांधे(मणके), मणक्यांमधील गोलाकार कूर्चा(डिस्क)या अंगांमध्ये विकृती असते, तेव्हा ती तीव्र वा जुनाट अशा दोन्ही प्रकारची असू शकते. सर्वसाधारण कंबरेचे दुखणे हे तीन दिवसांमध्ये कमी झाले पाहिजे. अशावेळी ७२ तासांमध्ये कंबरदुखी कमी न झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावे.मात्र खेळताना, मार लागल्यामुळे, घसरुन पडल्यामुळे वा अपघातामुळे झालेल्या कंबरदुखीमध्ये रुग्णाला हलता सुद्धा येत नसेल तर मात्र ताबडतोब डॉक्टरांकडॆ न्यावे.

रुग्णाने हालचाल केल्याने त्याची वेदना वाढत असल्यास हालचाल न करणे योग्य, अशावेळी रुग्णाला चादरीमध्ये झोपवून ती चादर चारही बाजूने उचलून डॉक्टरांकडे न्यावे किंवा डॉक्टरांना घरी बोलवावे. अपघातामुळे किंवा मार लागल्यामुळे होणा;या कंबरेच्या दुखण्याव्यतिरिक्त सर्वसाधारणपणे अचानक उद्भवलेले दुखणे सहसा लगेच बरे होते,असा अनुभव आहे,अर्थात हा काही नियम नाही.याऊलट जुनाट प्रकारची कंबरदुखी हा दीर्घकाळ पीडणारा त्रास आहे. साधारण तीन महिन्याहून अधिक काळ कंबरेचे दुखणे राहिल्यास त्याला जीर्ण कंबरदुखीचा शिक्का बसतो.

कंबरदुखी टाळण्यासाठी पाहू या काय आहेत उपाय-

ताठ बसावे – बसतांना नेहमी ताठ बसावे, मात्र बराच वेळ ताठ बसणेही चुकीचे आहे. बराच वेळ ताठ बसल्याने कंबरेवर ताण येत असतो. खूप वेळ एकाच स्थितीत काम करू नये.

असं करून पाहा – जर सलग ८ ते १० तास काम करायचे असेल तर मधे-मधे जागेवरुन उठावे. कंबर सैल सोडावी. पाठीला आराम देणंही गरजेचं आहे.

जास्त वजन उचलल्याने कंबर दुखू शकते – जेव्हा तुम्ही जड सामान उचलता त्यावेळी तुम्ही ते कसे उचलता हे महत्वाचं असतं. हाडे, स्नायू आणि हाडांच्या संबंधित इजा तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने उचलता.

असं करून पाहा – जड सामान उचलतांना नेहमी पायांच्या पंजांवर शरिराचा भार द्यावा. कंबर दुखत असल्यास जड सामान उचलणे टाळावे. तसेच जमिनीवरील वस्तू उचलतांना कंबरेत न वाकता, गूढघ्यांवर वाकावे.

बेड रेस्ट घ्यावी – कंबर दुखीवर उत्तम उपाय म्हणजे आराम करणे. मात्र सारखं झोपून राहणंही कंबरदुखीला आमंत्रण ठरू शकते.

असं करून पाहा – कंबर दुखत असतांना आराम करा. मात्र आधार घेत मधे-मधे उठून बसावे.

कंबर दुखीत हा उपाय करून पाहा – सकाळी मोहरी किंवा खोबरेतेल लसूण घालून गरम करावे आणि त्या तेलाने कंबरेची मालीश करावी. दुखत असलेल्या जागी गरम कापडाने शेक द्यावा.