बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या पिकाची खरिपात लागवड करताना योग्य ती काळजी घेतल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्य होईल.
तसेच पाऊस उशिरा, अनिश्चित व कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्यापेक्षा अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे हे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये या पिकाला महत्त्व आहे. कमी कालावधीत तयार होणारे तृणधान्य पीक असल्यामुळे खरिपानंतर रब्बीची पिके वेळेवर घेता येतात.
सोयाबीन, गहू व बटाटा या पिकांमधील सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी या पिकांचा फेरपालटीचे पीक म्हणून उपयोग होतो. बाजरीपासून तयार केलेले पोल्ट्री फीड, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना (लेअर) दिल्यास अंड्यामधील अनावश्यक कोलेस्टेरॉलचे (LDL) प्रमाण हे मक्यापासून बनविलेल्या पोल्ट्री फीडच्या वापरातून उत्पादित अंड्यामधील प्रमाणापेक्षा कमी असते.
400 ते 500 मी.मी. पावसाचे प्रमाण असलेल्या भागात हे पीक घेतात. उष्ण व कोरडे हवामान या पिकास चांगले मानवते. पिकाची उगवण व वाढ 23 ते 32 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते. पिकाच्या संपूर्ण वाढीच्या काळात स्वच्छ सूर्यप्रकाश अधिक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.
महत्वाच्या बातम्या –