अनाथांची माय हरपली! सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन

पुणे : अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal)  यांचे पुण्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. सकाळी ८ त्यांचे पार्थिव मांजरी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. १२ वाजता पुण्यात ठोसर पागेत दफनविधी करण्यात येईल. महानुभाव पंथाच्या अनुयायी असल्याने दफनविधी करण्यात येणार आहे.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. नको असताना मुलगी झाली म्हणून त्यांचे नाव चिंधी ठेवले होते. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव होता.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे केले काम

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. या ठीकाणी लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.

 सिंधुताईं सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित 

सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले होते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या भाषण कौशल्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आणि त्यांच्या सहज सध्या भाषेने सगळ्यांच्या माई झाल्या. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे. सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.