वेब टीम- वीज आज माणसांच्या मुलभूत गरजांपैकी एक अत्यावश्यक गरज झाली आहे. शहरीकरणासोबतच विजेची मागणी झपाटयाने वाढत आहे. सोबतच आज ग्रामीण भागातील विद्युतीकरणासह कृषिपंपासाठी विजेची मागणीही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पारंपरिक संसाधनाचा वापर करून उद्योग अथवा शेती करणे ओघाने कमी होत गेले. विजेचा वापर प्रत्येक जीवनावश्यक गोष्टीमध्ये होऊ लागला आहे. त्यामुळे साहजिकच वीज यंत्रणेवर कमालीचा भार वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील जवळपास अडीच कोटी ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने तारेवरची कसरत करत औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती ग्राहकांसह सर्व कृषिपंप ग्राहकांना वीजपुरवठा करण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. सिंगल फेज यंत्रणा राबवत गावासाठी आणि शेतीसाठी स्वतंत्र फीडर (वीजवाहिन्या) निर्माण करणारी महावितरण ही देशातील पहिली वीज वितरण कंपनी आहे. असे असले तरीही कृषिपंप धारकांकडून पुरेशी काळजी न घेतल्यामुळे रोहित्र नादुरुस्त होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर वीजपुरवठा होण्यास अडथळे निर्माण होतात. मागील काही वर्षाचा आढावा घेतल्यास महावितरणने रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण बरेचसे आटोक्यात आणले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक कटाक्ष टाकला असता कृषिपंप जळण्यास अथवा रोहित्र जळाल्याने कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित होण्यास कृषिपंपांना लावलेले ऑटोस्विच तसेच कॅपॅसिटर न लावणे या बाबी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण खूप महत्त्वाचे आहे. कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात. पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळतो, कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार ३० टक्क्यांने कमी होऊन रोहित्र नादुरुस्तीचे व जळण्याचेही प्रमाणही कमी होते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाबाचा, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळेल. या सर्वांचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे त्यांनी कॅपॅसिटरचा जास्तीत जास्त वापर करावा. प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा आणि रामबाण उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. मात्र बहुतांश ग्राहकांनी कृषिपंपास कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली असल्याने समस्या कायम आहेत. ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद असल्यास किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत. कॅपॅसिटर बसवून घेतल्यामुळे संबंधित रोहित्रावरील भार हा तीस टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल. कॅपॅसिटर बसविताना ते आयएसआय मार्कचे व नामांकित कंपनीचेच बसवून घ्यावेत. उदा. एल अँड टी, क्रॉम्पटन ग्रीव्हज, सुबोधन तसेच कॅपको यासारख्या कंपनीचे कॅपॅसिटर बसवावे.
कॅपॅसिटर बसविल्यानंतर अंदाजे कमी होणाऱ्या भाराचा तपशील
कृषिपंपांची क्षमता | कॅपॅसिटरची क्षमता | कृषिपंपाला कॅपॅसिटर नसल्याने मोटरला लागणारा भार | कृषिपंपाला कॅपॅसिटर असल्याने मोटरला लागणारा भार |
3 एच पी | 1 के.व्ही.ए.आर | 8.4 ॲम्पीअर | 7.5 ॲम्पीअर |
5 एच पी | 2 के.व्ही.ए.आर | 12.2 ॲम्पीअर | 10.0 ॲम्पीअर |
7.5एच पी | 3 के.व्ही.ए.आर | 17.6 ॲम्पीअर | 14.2 ॲम्पीअर |
12.5 एच पी | 5 के.व्ही.ए.आर | 27.0 ॲम्पीअर | 22.0 ॲम्पीअर |
उपरोक्त तकत्यानुसार कॅपॅसीटर वापरल्यास मोठया प्रमाणावर वीज भार कमी करता येऊ शकतो. त्याचबरोबर पंप जळण्याचे प्रमाण कमी होते, पंपाला लागणारी वीज (करंट) कमी लागते व पुरेसे व्होल्टेज मिळते. रोहित्रावरील 30 टक्के भार कमी झाल्यामुळे त्यावर अधिक भार देता येऊ शकतो व त्यामुळे जास्त कृषिपंप चालवणे सहज शक्य होते. तसेच वितरण हानी कमी होऊन वीजबिल कमी येण्यास मदत मिळते.
ऑटोस्विचचा वापर टाळा
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपाना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. राज्यात सुमारे ४१ लाख कृषिपंपधारक शेतकरी आहेत. महावितरणकडून या शेतकर्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकर्यांनी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकर्यांनाही सोसावी लागते. हे टाळण्यासाठी शेतकर्यांनी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावू नये.
कृषिपंपासाठी कॅपॅसिटर हा एखाद्या देवदुतासारखे काम करतो तर ऑटोस्विच हे मारक ठरू शकते. त्यामुळे कृषिपंपधारकांनी त्यांच्या पंपावर असलेले ऑटोस्विच तात्काळ काढून टाकावे. गरजेप्रमाणे कृषिपंप स्वत: चालू व बंद करावा. यामुळे रोहित्र अतिभारित होण्याचे प्रमाण कमी होते. रोहित्र जळून अथवा नादुरुस्त होऊन महावितरणचे पर्यायाने स्वत:चे रोहित्र नादुरुस्तीपोटी होणारे नुकसान कमी करण्यास मदत होईल. ऑटोस्विच काढणे काही कारणास्तव शक्य नसल्यास अतिभारित रोहित्रावरील कृषिपंपधारकांनी एकाच वेळी वीजपुरवठा सुरू करू नये. आपापसात ठरवून टप्प्याटप्प्याने कृषिपंप सुरू करावे. त्याचबरोबर मंजूर असलेल्या भार क्षमतेपेक्षा जर संलग्न वीज भार जास्त असेल तर अधिकृतरित्या वीज भार मंजूर करून घ्यावा, जेणेकरून कृषिपंपधारक वापरत असलेल्या क्षमतेच्या एच.पी.च्या अनुषंगाने महावितरणला रोहित्राची क्षमता वाढवण्यास किंवा नवीन रोहित्र मंजूर करण्यास व बसविण्यास मदत होईल.
ज्ञानेश्वर आर्दड
जनसंपर्क अधिकारी, महावितरण, बारामती परिमंडल