दोन दिवसांत कांदा दरामध्ये 800 रुपयांची घसरण

लासलगाव : लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे कांद्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे कांद्याने 150 ते 200 रुपये प्रति किलोचा टप्पा पारकेला होता. काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना लोकांना रडवणारा कांदा आता मात्र शेतकर्‍यांना रडवत आहे. दोनच दिवसांत कांदा दरामध्ये 800 रुपयांची घसरण झाली. कांद्याच्या पिकाची मागणी वाढली होती त्यामुळे केंद्र सरकारला कांदा आयात करावा लागला होता. त्यावेळी केंद्र सरकारने तुर्कस्तानातून कांदा आयात केला होता.

मात्र, आता बाजारात कांद्याची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे कांद्याचे दर झपाट्याने कोसळले आहे. तसेच यंदाच्या रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याचा अतिरिक्त पुरवठा देशाबाहेर जाण्यासाठी निर्यातबंदी हटवण्याची गरज आहे.

दहा ते बारा आठवड्यापूर्वी गगनाला भिडलेले कांद्याचे भाव अचानक 18 रुपयांवर येऊन ठेपले आहेत. आवक वाढल्याने कांदा आता मातीमोल भावाने विक्री होत असल्याने शेतकरी हा पूर्णत: हतबल झाला आहे. कांदा प्रति क्विंटल दोन हजार रुपयांच्या आत आल्याने शेतकर्‍यांचे संपूर्ण बजेट कोलमडले आहे. यंदा देशात गेल्यावर्षीपेक्षा 16 लाख टन कांद्याचे उत्पादन जास्त वाढणार असल्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. कांदा उत्पादन वाढीमध्ये नाशिक आणि नगर या दोन जिल्ह्याचा सर्वात मोठा वाटा आहे.

या पार्श्वभूमीवर वेळीच निर्यातबंदी मागे न घेतल्यास येणार्‍या काही आठवड्यात महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज लासलगाव येथील बाजार समितीत लाल कांदयाला कमीत कमी 900, सरासरी 1,800, जास्तीत जास्त 2,152 रुपये भाव मिळाला.

कांद्याचे बाजारभाव बाजारात गगनाला भिडले होते त्यामुळे केंद्र सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कांद्यावर निर्बंध आणत कांद्याची निर्यातबंदी केली होती. मात्र, आता कोरोना व्हायरसमुळे चीनचा कांदा कोणताही देश घेण्यास तयार नसल्याने त्याचा फायदा घेत भारतीय कांदा हा जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी आणि गेलेली जागतिक बाजारपेठ पुन्हा मिळवण्यासाठी तसेच कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी खुली करण्याची मागणी कांदा निर्यातदार व्यापार्‍यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार, उद्योग क्षेत्राने योगदान द्यावे – भगत सिंह कोश्यारी

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीच्या शेंगा काळवंडल्या

पाणी संकटावर मात करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर कर

‘पानी फाऊंडेशन’च्या उपक्रमास राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य – उद्धव ठाकरे