जिल्हा वार्षिक योजनेचा निधी विहित कालावधीत खर्च करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे – अब्दुल सत्तार

धुळे – कोरोना विषाणूचे संकट अद्याप संपुष्टात आलेले नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून होणाऱ्या विविध उपाययोजनांना गती देत जिल्हा वार्षिक योजनेचा निधी विहीत कालावधीत विकास कामांवर खर्च होण्यासाठी आतापासून नियोजन करावे. लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक काल सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, खासदार डॉ. हीनाताई गावित, आमदार किशोर दराडे, आमदार जयकुमार रावल, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. फारुक शाह, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी उपस्थित होते. धुळे जिल्ह्याचे पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी या बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले होते.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून 30 टक्के निधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरणासाठी राहणार आहे. त्यानुसार आरोग्य यंत्रणांनी नियोजन करावे. धुळे जिल्ह्यासाठी 200 डीपी (ट्रान्स्फॉर्मर) खरेदी करण्यात आले आहेत. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांकडून मागणी झाल्याबरोबर ते 72 तासांच्या आत बदलावेत. शाळांना तातडीने वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी. गाव- पाडे वीज जोडणीसाठी वीज कंपनीने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करीत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य द्यावे.

धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहे. जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2020- 2021 या आर्थिक वर्षातील समर्पित निधी परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. विमा कंपनीच्या परतावा योजनेत धुळे जिल्ह्यातील कापूस पिकाचा समावेश करण्याची शिफारस करण्यात येईल. तसेच या बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून जिल्हाधिकाऱ्यांनी दरमहा जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी केल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. रंधे, खासदार डॉ. गावित, आमदार श्री. दराडे, आमदार श्री. रावल, आमदार श्री. पावरा, आमदार श्रीमती गावित, आमदार डॉ. शाह यांनी विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती हटकर यांनी सूत्रसंचालन केले.

महत्वाच्या बातम्या –