फणस हा वर दिसायला काटेरी असला तरी फणसातील महत्त्वाचा खाद्य भाग म्हणजे पिकलेले गरे. हे गरे रुचकर, मधुर व गोड असतात.त्यात “अ’ आणि “क’ जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. पिकलेल्या फणस गरांपासून जेली, जॅम, सरबत, मुरांबा, फणसपोळी, स्क्वॅश, नेक्टतर इ. पदार्थ बनवितात. फणसापासून वेफर्स, चिवडासुद्धा बनविले जातात. कोवळ्या (कच्च्या) फणसाचा उपयोग भाजीसाठी केला जातो.
फणसाचे प्रकार
फणसाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात
१) कापा फणस
या जातीच्या फणसाचे गरे कोरडे, खुसखुशीत, गोड व चवीला उत्तम असतात. गराचा रंग पिवळा किंवा गडद केशरी असतो. या फणसाला बाजारात चांगली मागणी आहे. या फणसापासून लोणची, जॅम, जेली, तळलेले गरे (चिप्स), साखरेच्या पाकात वाळवलेले गरे, गऱ्यांची पावडर, तसेच पेय तयार केले जाते.
२) बरका फणस
या फणसाचे गरे मऊ असतात व ते रसाळ असून, त्यामध्ये तंतूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. गरांचा रंग पिवळसर पांढरा असतो व हे गरे जास्त काळ टिकत नाहीत. गरांचा उपयोग प्रामुख्याने फणसपोळी तयार करण्यासाठी केला जातो.
फणस श्रीखंड
- दही मलमलच्या कापडामध्ये बांधून ६ ते ८ तास टांगून ठेवावे त्यातील पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर चक्का मिळेल.
- चक्क्यामध्ये ५० ते ७० टक्के बारीक केलेली साखर मिसळावी. (१ किलो चक्क्यासाठी ५०० ते ७०० ग्रॅम साखर हे प्रमाण चक्क्याच्या आम्लतेनुसार कमी जास्त करावे.)
- साखर आणि चक्का चांगला एकजीव करून त्यामध्ये १५ टक्के फणस रस मिसळावा.
रसगुल्ला
- गाईच्या दुधाचा छन्ना बनवून घ्यावा. छन्ना चांगला मळून घ्यावा.
- छन्ना मळताना त्याला तेलकटपणा येणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्यामध्ये ८ ते १० टक्के फणसाचा रस मिसळावा.
छन्ना चांगला एकजीव करून त्याचे गोळे तयार करावेत. - गोळ्यांना तडे जात असल्यास त्यामध्ये थोडा (५ टक्के) मैदा मिसळावा.
- गोळे चांगले गुळगुळीत व तडा न गेलेले असावेत.
- एक लिटर पाण्यामध्ये २५० ग्रॅम साखर मिसळून पाक उकळावा. पाक उकळत असताना त्यामध्ये ३/४ चमचे दूध मिसळून पाकावर आलेला साका काढून टाकावा म्हणजे स्वच्छ पाक मिळू शकेल.
- उकळत्या पाकात छन्न्याचे गोळे सोडावेत. गोळे जास्त होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गोळे झाकण ठेवून पाकामध्ये शिजवून घ्यावेत.
- गोळे शिजताना त्यावर कायम पाक राहील याची काळजी घ्यावी, १० ते १५ मिनिटानंतर गोळे फुगलेले अढळून येतील. छन्ना चांगला मळून जर गोळे तयार केले असतील तर गोळ्यांना तडा जाणार नाही. गोळ्यांना पिवळसर रंग आ ल्यानंतर गॅस बंद करावा.
- २० ते २५ मिनिटांत रसगुल्ले तयार होतील. एकतारी पाकामध्ये २ ते ३ तास शिजवलेले गोळे मुरवावेत.
फणस पोळी
साहित्य : फणसाचा गर, साखर, तूप
कृत्ती : फणस पोळी तयार रसाळ फणसाचा वापर केला जातो. सर्वप्रथम फणसातल्या बिया काढून त्याचा गर वेगळा करुन घ्यावा. त्यानंतर त्यामध्ये फणसाचा गोडवा चाखून चवीनुसार साखर मिक्स करुन एकजीव करावे. एकजीव केलेले मिश्रण, तुपाचा हात लावलेल्या पसरट स्टीलच्या ताटात पातळ पसरावे. त्यानंतर ते ताट उन्हामध्ये वाळविण्यास ठेवावे. गराचा एक थर वाळल्यानंतर दुसरा थर द्यावा, असे थरावर थर देऊन जाडी ५ सें.मी. झाली की बटर किंवा ऍल्युमिनिअम फॉईलच्या पेपरमध्ये गुंडाळून रुंद तोंडाच्या बरणीत भरून साठवणीसाठी ठेवावे.
फणसाचा चिवडा
साहित्य : फणसाचे गरे, मीठ, तेल, चिवडा मसाला
कृती : फळाच्या गऱ्यांपासून उत्तम चिवडा तयार करता येतो. यासाठी काप्या फणसाचा वापर केला जातो. प्रथम कच्चा फणस घेऊन त्याचे गरे काढले जातात. गऱ्यांपासून बिया वेगळ्या करून चार जाड काप केले जातात. या कापांना एक वाफ दिली जाते किंवा उकळत्या पाण्यात दोन–तीन मिनिटे धरले जाते. त्यानंतर जास्तीचे पाणी निथळून देऊन तुकडे तळले जातात. तळत असताना त्यावर मिठाचे संपृक्त द्रावण शिंपडावे. तुकडे व्यवस्थित तळल्यानंतर तेलातून बाहेर काढून त्यावर आवडीप्रमाणे चिवडा मसाला घालावा आणि हा चिवडा बंद बरणीत भरुन ठेवावा.
वन महोत्सवात सवलतीच्या दराने रोपे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार