चंद्रपूर – शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे. विभागिय कृषी संशोधन केंद्रातील उपलब्ध तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा अवलंब करत शेतीचा विकास साधावा, तसेच पारंपारिक शेतीला पूरक व्यवसाय व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे आयोजित धान महोत्सव, शेतकरी मेळावा, कृषि प्रदर्शनी व चर्चासत्र कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, नगराध्यक्ष आशाताई गंडाटे, सभापती मंदाताई बाळबुद्धे, विजय कोरेवार, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे, विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अनिल कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कार्यक्रम समन्वयक डॉ. विनोद नागदेवते, प्राध्यापिका स्नेहा वेलादी प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतीतही आता डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, कृषी केंद्रातून अनेक प्रजातीचे धानाचे संशोधन झाले आहे. त्यासाठी कृषी संशोधन केंद्र सातत्याने कार्य करीत आहे. शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असून त्याची ओळख पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून होत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या मदतीने छोटे छोटे देश शेती व्यवसायात अग्रगण्य स्थानावर पोहोचले आहे. विदेशात 500 एकरसाठी फक्त 20 लोकांची आवश्यकता असते ऐवढे तंत्रज्ञान या देशांनी विकसित केले आहे. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत नवनवीन तंत्रज्ञानाचा व यंत्राचा वापर करावा व दर्जेदार व शाश्वत शेतीकडे वळावे.
पालकमंत्री श्री. वडेट्टीवार पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला ब्रह्मपुरी तालुका आहे. सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकाला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी काम सुरू असून मार्च 2022 नंतर सिंदेवाही तालुक्याचे 87 टक्के क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी उपलब्ध करून देण्यास मदत मिळणार आहे. यावर्षी सिंचनासाठी 850 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सन 2024 मध्ये शेतकऱ्यांना दोन पिकाचे नियोजन करता येईल एवढे क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
संशोधन केंद्रामध्ये शेडची उभारणी करून त्यामध्ये शेतीस उपयोगी असे विविध यंत्रे व अवजारे माहितीसह उपलब्ध ठेवावीत. जेणेकरून आलेल्या शेतकऱ्यांना त्या यंत्राची व वापर यासंबंधीची माहिती मिळू शकेल.
कृषी विद्यापीठाने तांदळामध्ये लाल तांदळाचे वाण विकसित केले आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कर्करोगाचे रुग्ण अधिक प्रमाणात आहे. त्यासाठी लाल तांदूळ हा आरोग्यास उपयोगी आहे, त्यामुळे कॅन्सरवर मात करण्यासाठी आहारात लाल तांदुळाचा समावेश करण्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन विभागीय कृषी संशोधन केंद्रास विविध यंत्रे, अवजारांसाठी 37 लक्ष रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला. कृषी संशोधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होत आहे.
धानाच्या माध्यमातून मूल येथे इथेनॉलचा मोठा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. त्यासोबतच दुधाचे उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्र बंद करावी लागली पण शेती हे एकच क्षेत्र असे होते जे पूर्णत: खुले राहिले. त्यामुळे ग्रामीण युवकांनी शेतीतून व्यावसायिक बनून आपला विकास साधावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
करडईचे क्लस्टर महाज्योतीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यात करडई पिकाच्या उत्पादन वाढीसाठी 5,500 शेतकऱ्यांना करडई पिकाचे बियाणे वाटप करण्यात येणार आहे. करडई तेल आरोग्यास उत्तम असून जनावरांपासून या पिकांची नासधूस होत नाही, नफा व उत्पन्न या पिकातून अधिक मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकावर अधिक भर द्यावा. चंद्रपूर वनसंपदेने व्यापलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात वनविद्या महाविद्यालय डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होईल. यासाठी 128 कोटी रुपये निधी उपलब्ध होत असल्याचेही पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले म्हणाले, शेतकऱ्यांनी संशोधन केंद्रात येऊन पिकांची, पीक पद्धतीची, लागवडीची, यंत्रे व अवजारांची माहिती घ्यावी व दर्जेदार शेती करावी. या भागातील शेतकरी अतिशय सहनशील असून शेतकऱ्यांनी खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावे.
त्यासोबतच, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाहीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अनिल कोल्हे यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये कृषी संशोधन शेतकऱ्यांसाठी लोकाभिमुख आहे, या केंद्राने आतापर्यंत एकूण 62 शिफारसी दिल्या असून प्रामुख्याने 16 वाण तर बाकी शिफारशी पीक संरक्षण व कृषिविद्या विषयाशी संबंधित आहे. पीडीकेव्ही साधना नवीन धानाचा वाण यावर्षी प्रसारित होत असल्याचे ते म्हणाले. तसेच कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांच्या सभेद्वारे या भागातील हवामान परिस्थितीवर आधारित पीक सल्ला शेतकरी व कृषी विस्तार अधिकाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन वेळा प्रसारित केला जातो. केंद्रावर 12 प्रकारचे धान, शेतीची कृषी यंत्रे, अवजारे प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध असून शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिके व प्रसार करावयाचा असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विभागीय संशोधन केंद्रातील माया कुटीला भेट देत पाहणी केली. तदनंतर, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत भाडेतत्त्वावर कृषी यंत्रे, अवजारे केंद्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी डॉ. कोल्हे यांनी अवजारे व यंत्राची माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली लोखंडे तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका स्नेहा वेलादी यांनी केले.
महत्वाच्या बातम्या –
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- दिवाळीत पावसाची शक्यता, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार
- दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल – दादाजी भुसे
- जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर
- एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता; कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ