नागपूर – जिल्ह्यातील महाविद्यालये सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार कृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये सुरु करण्यात यावी. महाविद्यालये सुरु करताना दोन डोस घेतलेल्या प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यासह सूक्ष्म लक्षणे आढळणाऱ्या प्रत्येकाची ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचणी करुन प्रवेश देण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर., राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातूरकर यांच्यासह महाविद्यालयांचे प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील महाविद्यालये तब्बल दीड वर्ष बंद होती. परंतु, कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करुन महाविद्यालये सुरु करण्यास राज्य शासनाने सूचित केले आहे. महाविद्यालये सुरु करताना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कोविड मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करावी. महाविद्यालयांमध्ये गर्दी न होता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करुन ऑफलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग सुरु करावी. विद्यार्थ्यांच्या प्रवेशा अगोदर प्रत्येक महाविद्यालयांनी इमारत, वर्ग तसेच परिसराचे निर्जंतूकीकरण करावे. महाविद्यालयाच्या प्रवेशव्दारावर थर्मल स्कॅनींग, मॉस्कचे वितरण, सामाजिक अंतराचे पालन आदी बाबींचे पालन व्हावे. पोस्ट कोविडची लक्षणे आढळणाऱ्या विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांची ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचणी करुनच महाविद्यालयात प्रवेश द्यावा, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.
महाविद्यालयात कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी खाद्यपदार्थ, पेय वितरीत होऊ नये म्हणून कॅन्टीन बंद ठेवावी. वसतीगृहे टप्प्याटप्प्याने सुरु करताना 50 टक्के क्षमतेने उपस्थिती असावी. एका खोलीत दोन विद्यार्थ्यांना राहू द्यावे. महाविद्यालयात वावरताना कोविड प्रतिबंधात्मक नियम व सूचनांची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी महाविद्यालयाच्या सूचना फलकावर त्यासंदर्भात माहिती दर्शविण्यात यावी. कोरोना लक्षणे आढळणाऱ्या विद्यार्थी व प्राध्यापकांना तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी महापालिका प्रशासनाला त्यासंदर्भात कळवावे. महापालिका प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे महाविद्यालयातील परिस्थितीचे निरीक्षण करुन त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
महत्वाच्या बातम्या –
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे मागणी
- कोविड काळात ऑनलाईन शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर
- ‘माविम’च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय – यशोमती ठाकूर
- दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांनी दर्जेदार सेवा द्यावी – आदिती तटकरे
- दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी पावले उचलण्याची दादाजी भुसे यांनी केली मागणी