कपाशीवरील रोग व उपाय –
कापूस पिकाचा मनुष्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. जगातील संपूर्ण देशांपैकी, भारतात कापसाची लागवड जास्त असली तरी प्रति हेक्टरी उत्पादन मात्र फारच कमी आहे. रोग हे कपाशीचे सर्वात मोठे शत्रु असून त्यापासुन फार मोठी हानी पोहोचते.
कापूस हे जगातील सर्वात मोठे पैशांचे पिक आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी रोगप्रतिबंधक इलाज शोधण्याचे प्रयत्न जोरात चालु आहेत. प्रस्तुत लेखांमध्ये कपाशीवरील प्रमुख रोगांची माहिती व त्यावरील उपाय दिलेले आहेत.
करपा –
हा रोग झॅनथोमोनास कॅपास्ट्रिस या जिवांणुमुळे होतो. पानाच्या खालील बाजुस तेलकट ठिपके असतात. ठिपके कालांतराने काळे पडतात. पानाच्या शिरा काळ्या पडुन पाने सुकतात व गळुन पडतात. पानांवरील ठिपके कोनाकृती असतात. रोगाची तीवृता जास्त असेल तर खोड व फांद्यादेखील काळसर दिसतात.
या रोगामुळे बोंडावर प्रथम काळपट हिरव्या रंगाचे गोलाकार ठिपके पडुन नंतर काळे पडतात. रोगट बोंडे पुर्ण न उमलता सुकतात व गळुन पडतात. परिणामी बोंडे पिवळसर होऊन उत्पन्न घटते. बोंडावरुन हा रोग बियाण्यांत प्रवेश करतो व पुढे जर हे बियाणे प्रक्रिया न करता वापरले तर पुन्हा त्याचा शेतात प्रवेश
उपाय –
1) या रोगाचा प्राथमिक प्रसार बियाण्यांमधुन होत असल्याने बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे असते. या करिता प्रती किलो बियाण्यास 1 ग्रॅम कोर्बोक्झिम (व्हिटॅवॅक्स)+3 ग्रॅम थायरम लावावे.
2) पेरणीसाठी तंतुविरहीत बियाणे वापरावे.
3) कपाशीच्या काढणीनंतर शेतातील पालापाचोळा व पऱ्याट्या वेचुन, जाळुन शेत स्वच्छ ठेवावे.
4) 50 टक्के कॉपर ऑक्सीक्लोराईड 20 ग्रॅम व 1 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. बागायती कपाशीवर रोगाच्या तीव्रतेनुसार 3-4 फवारण्या कराव्यात.
कवडी रोग –
हा रोग ग्लोमेरोल्ला या बुरशीमुळे होतो. रोपावस्थेत व पुर्ण वाढ झालेल्या झाडाच्या बोंडावर हा रोग आढळतो. रोपावस्थेत पानांच्या कडा तांबड्या होऊन पाने करपतात. रोपे कुजतात व मरतात. बोंडावर वर्तुळकार तांबुस खोलगट ठिपके पडतात. कापुस घट्ट चिकटुन राहतो व पिवळसर तपकिरी रंगाचा होतो व कवडीसारखा दिसु लागतो. बोंडे उमलत नाहीत.
उपाय –
1) बियाण्यास 1 ग्रॅम कार्बोक्झिम व 3 ग्रॅम थायरम चोळावे.
2) कार्बेन्डॅझिम अथवा बेनोमिलची 0.1 टक्का फवारणी करावी.
दहिया रोग –
हा रोग रॅम्युलॅरिया एरोओला या बुरशीमुळे होतो. हा रोग कपाशीची पुर्ण वाढ झालेली असताना येतो. सप्टेंबर-आक्टोबरमध्ये पडलेल्या पावसाने या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. जुन्या पानांवर प्रामुख्याने पानांच्या खालील बाजुस घुरकट पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ दिसते. परंतु काही वेळेस ही लक्षणे पानांच्या वरील भागावरील दिसतात. प्रथम ही वाढ कोनाकृती अथवा आकार रहित ठिपक्यांच्या स्वरुपात असते. परंतु अनुकूल वातावरणात बुरशीची वाढ झटपट होऊन
पानावर दही सांडल्यासारखे वाटते. म्हणुन या रोगास दहिय्या रोग म्हणतात.
उपाय – पाण्यात विरघळणाऱ्या गंधकाची 0.3 टक्के तीव्रतेच्या द्रावणाची अथवा 0.1 टक्का कार्बेन्डॅझिम अथवा 0.1 टक्का बेनोमिल यांची फवारणी रोग दिसू लागताच करावी.
पानावरील ठिपके –
हा रोग अल्टरनेरिया, हेलमेन्थोस्पोरियम मायरोथेशिअम व सरकोस्पोरा या बुरशीमुळे होतो. पानाच्या वरील बाजुस गोलाकार किंवा अनियमित पिवळसर, तपकिरी रंगाचे काळपट ठिपके पडतात. ठिपक्याच्या करड्या भागाकार वर्तुळाकार वलये दिसतात. ठिपके मोठे होऊन एकमेकांत मिसळतात. आणि अनियमित आकाराचे मोठे चट्टे तयार होतात. पोषक व दमट हवामानात रोगांची वाढ झपाट्याने होऊन रोगट पाने हळुहळु करडी पिवळी पडुन गळु लागतात. त्यामुळे बोडांची अपुरी वाढ होवुन उत्पादनात घट येते.
उपाय – मॅन्कोझेब 0.25 टक्के अथवा कॉपर-ऑक्सिक्लोराइच्या 0.3 टक्के तीव्रतेच्या द्रावणाची गरजेनुसार फवारणी करावी.
मररोग –
हा रोग फ्युजेरिअम ऑक्सिस्पोरम व्हसिफेक्टम या बुरशीमुळे होतो. वातावरणात उष्णता वाढु लागली की, या रोगाचा प्रादुर्भाव चालु होतो. या रोगाची सुरुवात रोपावस्थेपासुन ते पुर्ण वाढ होण्याच्या कालावधीत केव्हा ही होवु शकते. बी रुजल्यानंतर लगेचच या रोगाची लागण झाल्यास त्या झाडाची दले गळुन पडतात व नंतर येणारी पाने सुकतात.
शेतात सर्वत्र एकसारखी उगवण दिसुन येत नाही. या पुढील अवस्थेत रोग आल्यास पानांच्या कडा पिवळ्या पडुन पाने सुकतात. झाडांची वाढ खुंटते व झाड वरुन खाली या प्रमाणे वाळत जाते. असे झाड उपटुन त्याचे खोड हाताने दुभंगण्यास आतील मधला भाग पुर्णपणे काळा पडलेला दिसतो त्यामुळे जमिनीतुन मुळांद्वारे शोषलेल्या पाण्याचा वरच्या खोडांना पुरवठा होत नाही व शेवटी झाड पुर्णपणे वाळते.
उपाय
- मररोग प्रतिबंधक जातींची निवड करावी.
- उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. मररोगग्रस्त झाडे समूळ उपटुन त्यांचा नायनाट करावी.
- ट्रायकोडर्मा पावरड 6 ग्रॅम प्रती किलो बियाणे चोळुन नंतर पेरणी करावी.
मुळ कुजण्या रोग
हा रोग मायक्रोफामीना फेजीओलिना या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाड एकाकी वाळते व सहजरित्या उपटले जाते. झाडाची मुळे कुजुन त्यांची साल निघते व तंतुमय होते. मुळाच्या खालचा भाग प्रथम पिवळसर व नंतर काळसर होतो.
उपाय – बियाण्यांस 1 ग्रॅम कार्बोक्झिम + 3 ग्रॅम थायरम प्रतिकिलो लावावे. पिकाची फेरपालट करावी.
महत्वाच्या बातम्या –
- पुढच्या काही तासात राज्यात जोरदार पाऊस पडणार; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
- ‘या’ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
- सावधान! राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
- मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे २५ वर्षानंतर प्रथमच एका वर्षात जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- राज्यातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा इशारा