आपल्यापैकी जवळपास प्रत्येकालाच तोंड येणे या प्रकाराचा अनुभव आलेला असतो. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट, खारट, आंबट या चवी जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. हे दुखणे फार मोठे नसलं तरी त्याचा त्रास खूप होतो. वारंवार तोंड येण्याचा त्रास होणे हा प्रकृतीच्या दृष्टीने धोक्याचा इशारा असू शकतो. त्यामुळे वेळीच त्यावर योग्य ते उपचार घेणे महत्त्वाचे आहे. या आजाराचे मूळ कशात आहे आणि त्यावर उपाय कोणते आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात…
तोंड येणे म्हणजे नेमके काय? –
तोंड येणे या विकाराला माऊथ अल्सर किंवा स्टोमोटायटिस असेही म्हटले जाते. हा आजार म्हणजे तोंडाच्या आतल्या भागाला सूज येणे होय. यात ओठ, जीभ, पडजीभ, घसा, टाळा यांना सूज येते. त्यामुळे आपल्याला काहीही खाता येत नाही आणि नीट गिळताही येत नाही. यात फंगल इन्फेक्शन झाले, तर तोंडाला आतून बुरशी येते, प्रतिकारशक्ती कमी होते. काही वेळा तोंडाच्या आतली त्वचा सोलवटल्यासारखी होते. जीभ आणि संपूर्ण तोंड आतून घशापर्यंत लाल होते.
तोंड आल्यावर बर्याचदा आपण फक्त घरगुती उपचारांवर विसंबून राहतो. बर्याचदा त्याचा फायदाही होतो. परंतु वारंवार तोंड येण्याची समस्या सतावत असेल, तर त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक ठरते.
तोंड येण्याची कारणे काय –
- शरीरात अतिरिक्त उष्णता वाढणे. एखाद्या आजारावर दीर्घकाळ औषधे घेत असल्यास त्या औषधांचे साईड इफेक्ट होऊन तोंड येते. अति प्रमाणात चहा, कॉफी किंवा तंबाखूचे सेवन, अति धूम्रपान, अति प्रमाणात तिखट, तेलकट खाणे.
- चनाच्या तक्रारी, विशेषत: पोट साफ नसल्यासदातांचे विकार असल्यास किंवा दात झिजून टोकदार झाले असल्यास ते वारंवार लागूनही तोंडात व्रण होता आणि तोंड येण्याचा त्रास होतो.
- कुपोषण किंवा ब 12 या जीवनसत्त्वाचा आणि अन्य पोषक द्रव्यांचा अभाव. तोंडाच्या अस्वच्छतेमुळे होणारे इन्फेक्शन. अशा प्रकारे तोंड येण्याची कारणे वेगवेगळी असतात. त्यामुळे या त्रासाचे नेमके कारण शोधून त्यावर उपाययोजना केली जाणे महत्त्वाचे असते.
तोंड येणे यावर उपाय काय? –
- तोंड आल्यानंतरच्या वेदना कमी करून तात्पुरते बधीरत्व आणणारी मलमे सध्या उपलब्ध आहेत. त्यांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केला, तर वेदना कमी होऊन रुग्ण व्यवस्थित जेवण करू शकतो. त्यामुळे आहार कमी होऊन त्रास वाढण्याचे टळते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मल्टी व्हिटॅमिन आणि बी कॉम्प्लेक्सच्या सप्लीमेंट्स घ्याव्यात.
- उष्णतेने तोंड आले असल्यास अतिरिक्त उष्णता कमी करणारी औषधे घ्यावीत. नारळपाणी, सौम्य चवीचे सूप, थंड दूध असे घटक आहारात घ्यावेत.
- जीवाणू आणि विषाणू संसर्ग किंवा बुरशीच्या संसर्गाने तोंड आल्यास झाल्यावर अॅन्टीबायोटिक्स, अॅन्टी फंगल औषधे डॉक्टरांकडून घ्यावीत. कोमट दुधात हळद घालून प्यावे. शुद्ध गेरूची पूड, हळद आणि मध यांचे मिश्रण तोंडातील जखमा आणि व्रणांवर लावावे.
- पोटाच्या तक्रारींमुळे तोंड येत असल्यास पचन सुधारणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत पोट साफ राहावे यासाठी तंतुमय पदार्थांचा समावेश आहारात आवर्जून करावा. पोटाची संपूर्ण तपासणी करून घ्यावी. काही वेळा आतड्यांना होणार्या अल्सरचे सुरुवातीचे लक्षण म्हणून सतत तोंड येण्याची तक्रार उद्भवू शकते. अशी शंका असेल, तर गरम दुधात गाईचे तूप मिसळून नियमित प्यावे.
- आहार चौरस आणि सर्व पोषक द्रव्यांचा पुरवठा होईल असा असावा. अति तिखट, तेलकट जेवण टाळावे. तोंडाची नियमित व योग्य प्रकारे स्वच्छता करावी. पानतंबाखूचे अतिसेवन आणि धूम्रपान टाळावे.
- दंतवैद्याकडून दातांची तपासणी करून घ्यावी दात झिजून टोकदार झाले असतील, किंवा दातांचे तुकडे पडत असतील, तर त्यांची झीज थांबवण्यासाठी योग्य उपचार घ्यावेत. तुटलेल्या दातांवरही उपचार करून घ्यावे.
- विशिष्ट औषधांमुळे हा त्रास होत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे बदलून घ्यावी किंवा त्यांच्यापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी काय करता येईल, ते त्यांना विचारावे.
महत्वाच्या बातम्या –