शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील यंत्रणा सक्षम करण्यावर भर द्यावा – अमित देशमुख

मुंबई – यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात घडलेली घटना अत्यंत गंभीर असून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर संबंधित अधिष्ठांतामार्फत भर देण्यात यावा असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापन करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) संदर्भात आढावा बैठक  मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, नोडल ऑफीसर डॉ. संजय बिजवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून डॉक्टर बनण्याचे स्वप्न घेऊन विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असतात. तसेच महाविद्यालयामार्फत देण्यात आलेल्या वसतीगृहांमध्ये राहत असतात. अशा वेळी संबंधित अधिष्ठाता यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा अधिक कडक करणे आवश्यक आहे. तसेच रुग्णालयात येण्यासाठी आणि वसतीगृहामध्ये जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवल्यास काही प्रमाणात बाहेरुन येणाऱ्या गर्दीकडे लक्ष ठेवणे सोपे जाईल. संबंधित अधिष्ठाता यांनी यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापन करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) धोरण ठरविले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये पीपीपी तत्वानुसार बांधण्याचे प्रस्तावित असल्याने वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने संबंधित जिल्ह्यांचा केलेला आढावा याबाबतचा अहवाल सादर करावा. तसेच या अहवालामध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळ यासह रुग्णालयासाठी लागणारी साधनसामुग्री याबाबतही माहिती द्यावी. राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणी करीत असताना यासाठी पदनिर्मितीही करावी लागणार असल्याने याबाबतही अहवाल येत्या 15 दिवसांमध्ये सादर करण्यात यावा अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी दिल्या.

महत्वाच्या बातम्या –