मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये १९ हजार ६४८ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.
अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबरअखेर १ लाख ४७ हजार ८८१ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
मंत्री श्री. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.
नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी
विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९१ हजार ९०८ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
मुंबईत ऑक्टोबरमध्ये ७ हजार ६८६ बेरोजगारांना रोजगार
मंत्री श्री. मलिक म्हणाले की, माहे ऑक्टोबर २०२१ मध्ये विभागाकडे ५१ हजार ८६२ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ११ हजार ६९५, नाशिक विभागात ९ हजार ३९३, पुणे विभागात १३ हजार ९८४, औरंगाबाद विभागात ८ हजार ६७२, अमरावती विभागात ५ हजार ०७१ तर नागपूर विभागात ३ हजार ०४७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
माहे ऑक्टोबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १९ हजार ६४८ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ७ हजार ६८६, नाशिक विभागात ४ हजार ००४, पुणे विभागात ४ हजार ७४२, औरंगाबाद विभागात २ हजार ३७४, अमरावती विभागात ४८४ तर नागपूर विभागात ३५८ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.
महत्वाच्या बातम्या –
- त्वचेवर खाज येते असेल तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय!
- हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळणार
- गूळ खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या
- हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पाऊस कोसळणार
- राज्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस